आरवली - माखजन मार्गावर तलावसदृश्य खड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:07+5:302021-07-12T04:20:07+5:30
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील आरवली - माखजन या मुख्य रहदारीच्या मार्गावरील न्यू इंग्लिश स्कूल, माखजननजीक तलावसदृश्य लांब अंतरापर्यंत ...
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील आरवली - माखजन या मुख्य रहदारीच्या मार्गावरील न्यू इंग्लिश स्कूल, माखजननजीक तलावसदृश्य लांब अंतरापर्यंत खड्डा पडला आहे. त्यामध्ये पाणी साचल्याने त्यातून मार्ग काढत प्रवाशांसह वाहनधारक व पादचारी यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. मागील वर्षभरापासून याठिकाणी खड्डा पडला असून, अंदाजे दहा मीटर लांब खड्डा असल्याने रात्रीच्या वेळी रस्ताच दिसत नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे.
कोंडिवरे हायस्कूललगतच नवीन मोरीच्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभार व नाकर्तेपणामुळे माखजन परिसरात अनेक रस्ते सध्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. याची तत्काळ दखल वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घेऊन या रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक, ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी केली आहे.
---------------------------
माखजन खाडीपट्ट्यातील मुख्य रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. बांधकाम विभागातील कोणताही कर्मचारी अथवा इतर अधिकारी याठिकाणी भेट देत नाही. इथल्या गरीब जनतेला बस नसल्याने रामभरोसे चालतच प्रवास करावा लागत आहेत. त्यामुळे निदान रस्त्यांची तरी दुरुस्ती बांधकाम विभागाने करावी.
- बाबू मोरे, शिवसेना विभागप्रमुख, मावळंगे.