विरोधामुळे भूसंपादन मोजणी तिसऱ्यांदा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 06:44 PM2021-02-09T18:44:00+5:302021-02-09T18:45:36+5:30
highway Ratnagigir- मंडणगड तालुक्यातील लोणंद - आंबडवे राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन मोजणी प्रक्रियेला भुमिपुत्रांनी विरोध दर्शवल्यामुळे या रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेतील मोजणी प्रक्रिया तिसऱ्यांदा रद्द करावी लागली आहे. शेतकरी व जागा मालकांना आगाऊ नोटीस देऊन दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ रोजी ही मोजणी करण्यात आली होती. यासंदर्भात सोमवारी भुमिपुत्रांनी प्रशासनाला लेखी पत्र देऊन राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन अगर राष्ट्रीय महामार्गास भुमिपुत्रांचा विरोध नसून, राबविण्यात येणारी प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे म्हटले आहे.
मंडणगड : तालुक्यातील लोणंद - आंबडवे राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन मोजणी प्रक्रियेला भुमिपुत्रांनी विरोध दर्शवल्यामुळे या रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेतील मोजणी प्रक्रिया तिसऱ्यांदा रद्द करावी लागली आहे. शेतकरी व जागा मालकांना आगाऊ नोटीस देऊन दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ रोजी ही मोजणी करण्यात आली होती. यासंदर्भात सोमवारी भुमिपुत्रांनी प्रशासनाला लेखी पत्र देऊन राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन अगर राष्ट्रीय महामार्गास भुमिपुत्रांचा विरोध नसून, राबविण्यात येणारी प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे म्हटले आहे.
मौजे चिंचाळी गावची अतिरिक्त जमीन मोजणी दिनांक १९, २० व २१ जानेवारी २०२१ रोजी झालेली आहे. त्यांचे सीमांकन करून किती जमीन संपादीत केली जाणार आहे, त्याची माहिती अद्याप दिलेली नाही. मोजणीसंदर्भातील सर्व वाद - विवाद आक्षेप प्रलंबित असताना दिनांक ८ रोजी शेनाळे गावची मोजणी सुरू करण्यात आली. त्यामुळे आधीच्या मोजणीसंदर्भातील आक्षेपांचे निराकरण न करता मोजणी सुरू केल्यामुळे मोजणी प्रक्रियेला आक्षेप घेतला.
याआधीही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मोजणीला आमचा विरोध होता आणि आजही विरोध असल्याचे म्हटले आहे. टेबल पद्धतीने मोजणी करून पारदर्शकपणे सीमांकन दाखवून मोजणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच यापूर्वी मोजणीसंदर्भात अनेक तोंडी व लेखी आश्वासने देण्यात आलेली आहेत. पण त्याची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नसल्याचे म्हटले आहे.
टेबल मोजणी हवी
यावेळीही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मोजणी होत आहे. तशी न करता ती टेबल पद्धतीने करण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यास मोजणी झाल्यास आधीची हस्तांतरीत जागा किती, रस्ता किती होता, आता किती होणार यासह विस्तृत माहिती मिळू शकेल.