नागपूर महामार्गासाठी १५२ काेटी निधी प्राप्त; रत्नागिरी, संगमेश्वरातील २८ गावांचे क्षेत्र संपादित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 11:55 AM2021-11-29T11:55:08+5:302021-11-29T11:55:47+5:30

रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया २०१७ सालापासून सुरू झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ६ गावांना ६९ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे १५२ कोटी ७८ लाख रुपये इतका मोबदला जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.

Land acquisition for Ratnagiri-Nagpur National Highway in Sangameshwar and 27 villages in Ratnagiri | नागपूर महामार्गासाठी १५२ काेटी निधी प्राप्त; रत्नागिरी, संगमेश्वरातील २८ गावांचे क्षेत्र संपादित

नागपूर महामार्गासाठी १५२ काेटी निधी प्राप्त; रत्नागिरी, संगमेश्वरातील २८ गावांचे क्षेत्र संपादित

googlenewsNext

रत्नागिरी : रत्नागिरी - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यांमधील २८ गावांमधील क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. या गावांपैकी संगमेश्वर तालुक्यातील ३ गावांसाठी ५० कोटींचा निधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला नुकताच प्राप्त झाला असून, यापूर्वी या तालुक्यातील २ गावांसाठी ३३ कोटी ६५ लाखांचा निधी मिळाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ६ गावांना ६९ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे १५२ कोटी ७८ लाख रुपये इतका मोबदला जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.

रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया २०१७ सालापासून सुरू झाली आहे. रत्नागिरी ते आंबा घाटापर्यंतच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनाची जबाबदारी रत्नागिरी उपविभागीय कार्यालयाकडे देण्यात आली आहे. त्यानुसार या कार्यालयाकडून संगमेश्वर तालुक्यातील १३ गावांमधील एकूण १३,३६,८३७ चौरस मीटर आणि रत्नागिरी तालुक्यातील १५ गावांमधील ६,५२,२२० चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. रत्नागिरीतील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील दहा अशा एकूण १६ गावांतील जमीनमालकांचे मोबदला निवाडेही फेब्रुवारी २०१९ मध्ये झाले आहेत. या निवाड्यांची एकूण रक्कम ३१४ कोटी १३ लाख २१ हजार इतकी आहे.

दोन्ही तालुक्यांतील या निवाड्यांचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार रत्नागिरी तालुक्यातील पाली, पाली बाजारपेठ, साठरे, खानू, हातखंबा आणि पानवल या सहा गावांच्या निवाड्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रुपये प्राधिकरणाकडून येथील उपविभागीय कार्यालयाकडे फेब्रुवारी २०२० अखेर आली होती. तिचे वाटप करण्यात आले आहे. तसेच २७ ऑक्टोबर रोजी संगमेश्वर तालुक्यातील निनावे आणि दखीन या गावांसाठी ३३ कोटी ६४ लाख ८६ हजार ५३४ एवढा मोबदला प्राप्त झाला आहे. त्यानंतर आता महिनाभरात पुन्हा या तालुक्यातील जंगलवाडी, मेढेतर्फे देवळे आणि करंजारी या आणखी तीन गावांसाठी नोव्हेंबर महिन्याच्या गेल्या आठवड्यात ५० कोटींचा मोबदला जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या पाच गावांसाठी आलेल्या ८३ कोटी ६४ लाख ८६ हजार ५३४ रुपये मोबदला वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या गावांमधील खातेदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे. कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खातेदारांच्या खात्यावर त्यांचा मोबदला जमा होणार आहे.

- रत्नागिरी - नागपूर महामार्ग चाैपदरीकरणात संगमेश्वरमधील १३ गावे आणि रत्नागिरी तालुक्यातील १५ अशा एकूण २८ गावांचा समावेश आहे.

- ३४ हेक्टर ३७ आर इतके क्षेत्र संपादित करण्यात आले असून, ३ हेक्टर ३९ आर इतके क्षेत्र संपादन करावयाचे आहे. तर संगमेश्वर तालुक्यातील ८९ हेक्टर ९८ आर इतके क्षेत्र संपादित करण्यात आले असून, १ हेक्टर १० आर एवढ्या क्षेत्राचे संपादन बाकी आहे.

- संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे, करंजारी, जंगलवाडी, दाभोळे, दाभोळे खुर्द, मेढेतर्फे देवळे, कोंडगाव, साखरपा, साखरपा खुर्द, दखिण, निनावे, ओझरे, मुर्शी या १३ गावांचा समावेश असून, रत्नागिरी तालुक्यातील झाडगाव, नाचणे, पडवेवाडी, मधलीवाडी, कुवारबाव, कारवांची वाडी, खेडशी, पानवळ, हातखंबा, बाजारपेठ, पाली, साठरे, खानू, नाणीज या १५ गावांचा समावेश आहे.

Web Title: Land acquisition for Ratnagiri-Nagpur National Highway in Sangameshwar and 27 villages in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.