रिफायनरीसाठी दुसऱ्या दिवशीही भूसर्वेक्षण सुरु, अटक केलेल्या लोकांचा जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 12:03 PM2023-04-27T12:03:34+5:302023-04-27T12:03:57+5:30
रिफायनरी प्रकल्प ज्या जागेत उभा केला जाणार आहे, तेथील मातीचे परीक्षण करण्यासाठी खोदकाम सुरू आहे
रत्नागिरी : कोणताही अडथळा न येता बुधवारी बारसू येथील नियोजित रिफायनरी प्रकल्पासाठीच्या भू-सर्वेक्षणाचे काम सुरू होते. दुसऱ्या बाजूला ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बारसू येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. ठाकरे शिवसेना आंदाेलकांच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांनी शिंदे सरकारवर कडाडून टीका केली. मंगळवारी अटक केलेल्या ११० लोकांचा जामीन बुधवारी राजापूर न्यायालयात मंजूर झाला आहे.
रिफायनरी प्रकल्प ज्या जागेत उभा केला जाणार आहे, तेथील मातीचे परीक्षण करण्यासाठी खोदकाम सुरू आहे. मंगळवारी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर दुपारच्या सत्रात हे खोदकाम सुरू झाले आहे. बुधवारीही हे खोदकाम सुरू होते. त्यात कोणताही अडथळा आलेला नाही.
बारसूतील काही स्थानिक ग्रामस्थ सर्वेक्षण स्थळानजीकच्या माळरानावर अजूनही थांबून आहेत. माळरानावर एका झाडाखाली सर्वांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. बुधवारी सकाळी खासदार विनायक राऊत, कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी बारसू येथे भेट दिली. त्यांच्यासोबत ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी प्रकल्पस्थळी जाणार असल्याचे समजल्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी जिल्हाप्रमुख चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्या साळवी, प्रमोद शेरे यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीस दिल्या. मात्र तरीही हे पदाधिकारी रत्नागिरीतून बारसूकडे रवाना झाले.
बारसू सर्वेक्षण स्थळापासून पाच किलोमीटर आधीच धारतळे येथे ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ताफा अडवण्यात आला. पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक या दोघांच्याच वाहनांना पुढे जाऊ देण्यात आले. माळरानावर बसलेल्या ग्रामस्थांशी खासदार राऊत यांनी संवाद साधला आणि ठाकरे शिवसेना लोकांसोबत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर कडाडून टीका केली. दडपशाहीचा वापर करून प्रकल्प पुढे रेटण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमदार राजन साळवी यांचे समर्थन
ठाकरे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी सोमवारी आंदोलनाची सुरुवात झाल्यापासूनच मौन बाळगून होते. बुधवारी सकाळी त्यांनी ‘कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यासाठी प्रकल्पाचे समर्थनच’ असे ट्वीट केले. विरोध करणाऱ्यांना प्रशासनाने प्रकल्पाची बाजू पटवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी यातून प्रशासनाला केले आहे.
विनायक राऊत यांची सारवासारव
आमदार राजन साळवी यांच्या ट्वीटबाबत प्रतिक्रिया देताना खासदार राऊत म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रिफायनरीबाबत जी भूमिका घेतील, तीच आपल्याला मान्य असेल असे राजन साळवी यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे यात प्रतिक्रिया देण्यासारखे काही नाही.