कुंभार्ली घाटात पुन्हा दरड कोसळली, काही वेळातच वाहतूक सुरु
By संदीप बांद्रे | Published: July 19, 2022 03:03 PM2022-07-19T15:03:46+5:302022-07-19T19:22:24+5:30
अवजड वाहने घाटमाथ्यावर व पायथ्यालगत थांबवून ठेवण्यात आली
चिपळूण : कराड चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा दरड कोसळली. सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा तत्काळ घटनास्थळी पोहोचली असून दरड हटविण्याचे काम सुरू केले. दरड हटविल्यानंतर या मार्गावरून पुन्हा वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
काही दिवसापुर्वी मुसळधार पावसात कुंभार्ली घाटात दरड कोसळण्याची घटना घडली होती. दरडीचा भराव रस्त्यावर आल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. त्यानंतर आता पुन्हा या घाटातील सोनपात्रा ठिकाणालगत दरड कोसळली आहे. दरडीसोबत मोठ मोठे दगड रस्त्यावर आल्याने हा मार्ग काहींसा बंद पडला. तरीदेखील किरकोळ वाहने रस्त्याच्या एका बाजूने सोडली जात होती. मात्र अवजड वाहने घाटमाथ्यावर व पायथ्यालगत थांबवून ठेवण्यात आली होती.
या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जेसीबी व अन्य यंत्रणा पोहोचली असून दरड हटविण्याचे काम सुरू केले आहे. याआधी खड्यांमुळे कुंभार्ली घाट रस्ता मृत्युचा सापळा बनला होता. मात्र आता दरडीमुळे हा मार्ग धोकादायक ठरू लागला आहे.
रघुवीर घाटात दरड कोसळली
पर्यटकांना पर्यटनासाठी एक जुलै पासून बंद करण्यात आलेल्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटातही दरड कोसळली आहे. यावर्षी पहिल्यांदाच दरड कोसळण्याची घटना घडली असून प्रशासनाने दरड हटवण्यासाठी यंत्रणा लावली आहे.