परशुराम घाटात दरड कोसळली, दरडीखाली दोन पोकलेन अडकले; चौपदरीकरणाचे काम सुरु असतानाच घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 11:45 AM2022-02-08T11:45:50+5:302022-02-08T11:46:34+5:30
घटनास्थळी मदतीसाठी तात्काळ अन्य यंत्रणा दाखल झाली आहे.
चिपळूण : मुंबई-गोवामहामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरु असतानाच दरड कोसळल्याची भीषण घटना मंगळवारी सकाळी 10.45 वाजता घडली. या दरडीखाली दोन पोकलेन व त्यांचे चालक अडकले आहेत. घटनास्थळी मदतीसाठी तात्काळ अन्य यंत्रणा दाखल झाली आहे.
या घाटातील मध्यवर्ती ठिकाणी चौपदरीकरणा अंतर्गत डोंगर कटाई सुरु आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कामी लागली आहे. रस्त्याच्या वरील बाजूस पोकलेनने खोदाई केली जात असतानाच बाजूचा डोंगराचा भाग खाली आला. त्यामध्ये दोन पोकलेन अडकले. तसेच त्याचे चालकही त्यामध्ये अडकले आहेत.
त्यांना बाहेर काढण्यासाठी अन्य पोकलेन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम सुरू आहे. तसेच अन्य यंत्रणा ही दाखल झाली आहे. या घटनेमुळे घाटात दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली आहे.
याआधीही पावसाळ्यात परशुराम घाटात दरडीचा धोका निर्माण झाला होता. दरम्यान यावेळस काही दुर्घटना घटना घडल्या. त्यामध्ये पेढे येथील एका घरावर दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. त्यांनतर चार दिवसांपूर्वीच एक भलामोठा दगड पेढे बौद्ध वाडी येथील घरावर येऊन मोठे नुकसान झाले होते.
या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, ठेकेदार कंपनी व ग्रामस्थांची बैठक घेतली गेली. या बैठकीत काही ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन दिवसातच दरड कोसळल्याची भीषण घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.