परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली, ९ जुलै पर्यंत वाहतूक बंदच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 06:43 PM2022-07-06T18:43:32+5:302022-07-06T19:08:58+5:30
दरड कोसळल्यास जिवीतहानी होऊ शकते. यामुळे घाट मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट पावसामुळे धोकादायक बनल्याने या मार्गावरील वाहतूक दोन दिवसांपासून बंद आहे. तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे चौपदरीकरणासाठी डोंगर कटाई केलेल्या परशुराम घाटात सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. आज, बुधवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी घाटाची पाहणी करण्यासाठी आले असतानाच अधिकाऱ्यांसमोरच पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे ९ जुलै पर्यंत या मार्गावरील वाहतूक बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
परशुराम घाटात शनिवारी (दि.२) रात्री दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर रात्री ३ वाजेपर्यंत घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडतच आहेत. कल्याण टोलवेज या कंपनीच्या हद्दीत असलेल्या कामाच्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना नियमीत सुरू आहेत. डोंगरात काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे तेथे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटात ठरावीक ठिकाणीच दरडी कोसळण्याचा अधिक संभव आहे.
घाटातील वाहतूक सुरू असतानाच दरड कोसळल्यास जिवीतहानी होऊ शकते. यामुळे घाट मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.