अंजनी रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळली, कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 02:09 PM2022-07-15T14:09:52+5:302022-07-15T14:10:38+5:30
रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दरड हटवून रेल्वे वाहतूक सुरळीत केली
खेड : तालुक्यातील अंजनी रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी (ता.१४) दुपारी दीड वाजता रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दरड हटवून रेल्वे वाहतूक सुरळीत केली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अंजनी रेल्वे स्थानक व चिपळूण रेल्वे स्थानकादरम्यान दुपारी दीड वाजेच्या सुमारास रेल्वे रुळावर दरड कोसळली. मोठ-मोठे दगड व चिखलमिश्रित माती रुळावर आली. त्याची सूचना मिळताच मुंबईकडून आलेली मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकातच उभी करून ठेवण्यात आली आणि या रेल्वेचे इंजिन काढून घटनास्थळी पाठविण्यात आले.
गेले आठ दिवस चिपळूण, खेड परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे वाशिष्ठी, जगबुडी नद्यांसह तालुक्यातील अन्य नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. गुरुवारी दुपारी सव्वा ते दीड वाजेच्या सुमारास खेड ते अंजनीच्या दरम्यान डोंगरातील दरड रुळावर आली होती.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर तत्काळ कोकण रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून दरड - माती बाजूला करण्याचे काम सुरू केले. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी मडगावकडे जाणारी हापा एक्स्प्रेस गाडी (क्रमांक २२९०८) कळंबणी स्थानकात तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम गाडी विन्हेरे स्थानकात आणि सावंतवाडी दिवा एक्स्प्रेस (५०१०४) चिपळूण स्थानकात थांबविण्यात आली होती.
कोकण रेेल्वे प्रशासनाने रुळावर पडलेली दरड तीन तासांत हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. यानंतर खेड रेल्वे स्थानकात उभी असलेली मांडवी एक्स्प्रेस संध्याकाळी साडेचार वाजता रवाना करण्यात आली.
तारेच्या जाळ्यासह दरड कोसळली
गेल्या काही वर्षांत कोकण रेल्वेने दरडग्रस्त भागात डोंगरावर तारेच्या जाळ्या लावल्या आहेत. त्यामुळे ट्रॅकवर दरडी कोसळण्याचे प्रमाण घटले आहे. गुरुवारी कोसळलेली दरड ही तारेच्या मजबूत जाळ्या तोडून ट्रॅकवर आलेली आहे. या घटनेमुळे कोकण रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. मुंबईत जाण्यासाठी खेड रेल्वे स्थानकात आलेल्या काही प्रवाशांनी अखेर एसटी बस स्थानक गाठले.