परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प
By संदीप बांद्रे | Published: July 19, 2023 03:58 PM2023-07-19T15:58:49+5:302023-07-19T16:05:00+5:30
सध्या वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बाजारपेठेतील नाथ पै चौक, चिंचनाका, मच्छी मार्केट, पेठमाप, भेंडीनाका, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे.
चिपळूण : कोकणात पावसाचं थैमान सुरू आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. यामुळे काही वेळासाठी घाटातील थांबविण्यात आली आहे. परिणामी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. शिवाय पावसाचा जोर कायम शहर हद्दीत पाणी पातळीही वाढत आहे.
महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरण केल्यानंतर दरडीचा धोका वाढला आहे. आतातपर्यंत तीन वेळा दरड कोसळली. अशातच बुधवारी चिपळूण परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली. आधी कुंभार्ली घाटात दरड कोसळली, त्यापाठोपाठ परशुराम घाटात दरड कोसळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. या घटनेमुळे घाटातील वाहतूक दरड बाजूला करे पर्यंत थांबविण्यात आली आहे. अजूनही रस्त्यावर आलेले दगड व माती हटविण्याचे काम चालू आहे. सध्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतर दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली आहे.
सध्या वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बाजारपेठेतील नाथ पै चौक, चिंचनाका, मच्छी मार्केट, पेठमाप, भेंडीनाका, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. नगर परिषदेच्या बोटी सांस्कृतिक केंद्र, शंकरवाडी, बाजारपेठ विसर्जन घाट, बस स्थानक, नगर परिषद कार्यालय या ५ ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. नगर परिषदेची ९ पथके, तर एनडीआरएफची पथके ६ ठिकाणी तैनात केलेली आहेत. एका पथकात ५ तलाठी, ३ पोलीस व ३ जवान आहेत. या पथकासोबत एकूण ४ बोटी आहेत.
कुंभार्ली घाटातील दरड हटविण्यात आली असून आता दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील मिरजोळी जुवाड बेट येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. ते सर्वजण आपल्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतरीत झाले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने चिपळूण तालुक्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.