रत्नागिरीनजीकच्या मिरजोळे गावात भूस्खलन, शेतजमिनीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 04:32 PM2018-06-29T16:32:55+5:302018-06-29T16:42:50+5:30
रत्नागिरी शहराजवळच्या मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचा पाट भागात शेताच्या पट्ट्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे मोठे भूस्खलन होण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी २००६ साली याच ठिकाणी मोठे भूस्खलन झाले होते. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या भूस्खलनामुळे शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी : शहराजवळच्या मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचा पाट भागात शेताच्या पट्ट्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे मोठे भूस्खलन होण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी २००६ साली याच ठिकाणी मोठे भूस्खलन झाले होते. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या भूस्खलनामुळे शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.
मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचापाट येथे भूस्खनाचे प्रकार सुरूच आहेत. २००६ मध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन सुमारे ४-५ एकर जमीन एकाचवेळी खचली होती. त्यामुळे येथील शेती, बागायती देखील उद्ध्वस्त झाली आहे. भूस्खलनाच्या धोक्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी शेतीच करणे सोडून दिले आहे.
तत्कालीन प्रांताधिकारी फरोग मुकादम यांनी त्यावेळी तातडीने या भागाची पाहणी केली होती. भूवैज्ञानिक स्तरावरूनही या प्रकारची दखल घेण्यात आली होती. रिंग लॅण्ड स्लाईड प्रकार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर झालेल्या नुकसानाचा अहवाल तयार करून उपाययोजनेसाठी पाठवण्यात आला होता.
सातत्याने पाठपुरावा करून त्याठिकाणी आपत्कालीन उपयोजना झाली काँक्रीटचा धूपप्रतिबंधक बंधारा आणि नदीवर छोटा बंधारा (धरण) बांधण्यात आले. त्यावर सुमारे १५ ते २० लाख खर्च झालेत. मात्र, पुन्हा एकदा भूस्खलनाचा प्रकार घडला आहे.
अतिवृष्टीमुळे सुमारे १०० फूट लांब आणि १५ ते २० फूट उंच जमीन खचली आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झालेत. याठिकाणी दत्ताराम गावकर, राजाराम गावडे, गंगाराम गावकर, भास्कर चव्हाण, रमेश भाटकर, आणि आता भाऊ भाटवडेकर यांची शेतजमीन खचून नुकसान झाले आहे.