लांजा, संगमेश्वरचे टँकर भागवताहेत राजापूरची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:32 AM2021-05-21T04:32:17+5:302021-05-21T04:32:17+5:30
रत्नागिरी : ताैक्ते वादळामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने त्या गावातील नळपाणी योजना बंद झाली आहे़ ...
रत्नागिरी : ताैक्ते वादळामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने त्या गावातील नळपाणी योजना बंद झाली आहे़ दरम्यान, तालुका प्रशासनाने लांजा आणि संगमेश्वर येथून प्रत्येकी एकेक असे दोन शासकीय टँकर आणून काही गावांना मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरू केला आहे.
ताैक्ते वादळाचा जोरदार तडाखा तालुक्यातील विद्युत वितरण विभागाला बसला आहे़ तालुक्याच्या पश्चिम परिसरात तर वादळाने वितरण विभागाचे मोठे नुकसान केले आहे़ त्या परिसरातील अनेक गावांतील नळपाणी योजना विद्युत पुरवठा बंद असल्याने ठप्प झाल्या आहेत़ त्यामुळे पाणीपुरवठा न झाल्याने त्या गावातील जनता त्रस्त झाली आहे़ दरम्यान, पाण्यासाठी होत असलेली वाढती मागणी पाहून तालुका प्रशासनाने लांजा व संगमेश्वर येथून प्रत्येकी एकेक असे दोन शासकीय टँकर मागविले आहेत़ प्रशासनाच्या सूचनेनुसार बुधवारी अणसुरे, जैतापूर, दळे व माडबन या गावांसाठी टँकर पाठविण्यात आले. उर्वरित गावांनाही पाणीपुरवठा टँकरने केला जाणार आहे़ अजून काही गावे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत़ प्रशासनाने त्याची दखल घेताना आणखी एखादा टँकर मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
दरम्यान, विद्युत वितरणचे कर्मचारी जोमाने काम करीत असून तुटलेल्या तारा व पडलेले विद्युत खांब उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामध्येही अडचणी येत असल्या तरी पुढील एक-दोन दिवसांत तालुक्याच्या पश्चिम भागातील खंडित विद्युत पुरवठा सुरळीत कसा सुरू होईल त्यासाठी वितरण विभाग झटत आहे़ त्यानुसार वीजपुरवठा सुरू झाल्यास विजेअभावी बंद पडलेल्या नळपाणी योजना पूर्ववत सुरू होतील आणि तेथील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.