‘प्रवासी वाढवा’ अभियानात लांजा आगार अव्वल
By admin | Published: April 19, 2017 01:03 PM2017-04-19T13:03:21+5:302017-04-19T13:05:03+5:30
९ लाख ६ हजार प्रवाशांची वाहतूक
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी, दि. १९ : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवासी वाढवा अभियान राबविण्यात आले. जानेवारी ते मार्चअखेर तीन महिन्यांसाठी ‘प्रवासी वाढवा’ अभियान राबवत असताना आगारनिहाय प्रवासी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. लांजा आगाराने उद्दिष्ट पूर्ण करून विभागात अव्वल क्रमांक मिळवला आहे.
‘प्रवासी वाढवा अभियान’ संपूर्ण राज्यभरात एकाचवेळी राबवण्यात आले. जानेवारी ते मार्च तीन महिन्यांच्या कालावधीत प्रवासी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. लांजा आगारासाठी ८ लाख ४३ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट निश्चित केले होते. परंतु लांजा आगाराने ९ लाख ६ हजार प्रवाशांची वाहतूक करून संपूर्ण विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
राजापूर आगारासाठी ७ लाख ४ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट असताना ७ लाख ५२ हजार प्रवासी मिळवले आहेत. दापोली आगारासाठी ८ लाख ३८ हजारांचे उद्दिष्ट होते. परंतु आगाराने ८ लाख ५६ हजार प्रवासी मिळविले आहेत. राजापूर आगाराने उद्दिष्टापेक्षा ४८ हजार व दापोली आगाराने १८ हजार अधिक प्रवासी मिळवून बक्षिसाच्या स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे.
खेड आगाराला ११ लाख ४६ हजारांचे उद्दिष्ट असताना ११ लाख ९ हजार प्रवासी मिळवले आहेत. चिपळूण आगारासाठी १६ लाख ८४ हजाराचे उद्दिष्ट होते. पैकी १६ लाख ५८ हजार प्रवासी मिळवले.
गुहागरसाठी ९ लाख ८७ हजाराचे उद्दिष्ट असताना ९ लाख ६७ प्रवासी मिळवले. देवरूख आगारासाठी १५ लाख ८३ हजारांचे उद्दिष्ट होते, पैकी १४ लाख ८१ हजार प्रवासी मिळवण्यात यश आले.
रत्नागिरी आगाराला २६ लाख ३८ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट होते, पैकी २३ लाख ४० हजार प्रवासी मिळवण्यात यश आले. मंडणगड आगारासाठी ४ लाख ६५ हजाराचे उद्दिष्ट असताना ३ लाख ८५ हजार प्रवाशी मिळविण्यात आले. संपूर्ण रत्नागिरी विभागासाठी एक कोटी ९ लाख १७ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट होते, मात्र, एक कोटी ३ लाख ५६ हजार प्रवासी मिळविण्यात यश आले. (प्रतिनिधी)