सुरुंगामुळे धुत्राेली परिसर हादरला, अनधिकृत कार्यवाहीच्या विरोधात कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 01:47 PM2022-03-05T13:47:20+5:302022-03-05T13:47:45+5:30
या स्फाेटामुळे तीन किलोमीटरचा परिसर हादरुन गेला
मंडणगड : तालुक्यातील आंबडवे - राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काॅंक्रीटीकरणाद्वारे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या खडीसाठी काळा दगड उत्खननासाठी बाेअर सुरुंग लावण्यात येत आहेत. हे सुरुंग महामार्ग प्राधिकरणाच्या एजन्सीद्वारे अनधिकृतरित्या लावण्यात येत असल्याची बाब समाेर आली आहे. या सुरुंगामुळे धुत्राेली परिसर आवाजाने हादरुन गेला असून, याविराेधात शिरगाव ग्रामपंचायतीने तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांच्याकडे निवेदन दिले आहे.
या निवेदनातील माहितीनुसार, मंडणगड तालुक्यातील धुत्रोली कार्यक्षेत्रामध्ये दिनांक ३ मार्च २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता अचानक स्फोटाचा आवाज आला. या स्फाेटामुळे तीन किलोमीटरचा परिसर हादरुन गेला. हा आवाज मौजे धुत्रोली गावाजवळून आल्याचे कळताच ग्रामस्थांनी तेथे जाऊन पाहणी केली. यावेळी काळा दगड उत्खननासाठी ४ इंचाचा बोअर ब्लास्ट लावल्याचे दिसले. हे काम अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीमार्फत सुरु असल्याचे सांगण्यात आले.
बोअर ब्लास्ट काढण्यापूर्वी संबंधित खात्याची पूर्वपरवानगी घेतली आहे का, याची विचारणा ग्रामस्थांनी केली. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने नागरिकांनी त्यासंदर्भात कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. संबंधित कंपनीला ग्रुप ग्रामपंचायत, शिरगाव यांनी माती व दगड उत्खनन करण्यासाठी इतर खात्यांचे अधिकार राखून नाहरकत दाखला दिला आहे. मात्र, कोणत्याही चार इंच बोअर ब्लास्ट करण्यासाठी ग्रामपंचायतीने त्यांना नाहरकत दाखला दिलेला नाही. कंपनीने ग्रामपंचायतीची फसवणूक केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या अनधिकृतपणे केलेल्या कार्यवाहीसंदर्भात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी माजी उपसरपंच इरफान बुरोंडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पवार, दीपाली धामणस्कर, आश्मि कदम, अजीम कडवेकर, संतोष पार्टे, संजय सुगदरे, अजित कदम, संदीप धामणस्कर उपस्थित होते.
नाेटीस काढणार
तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. त्यावेळी कोणतीही परवानगी न घेता हे ब्लास्टिंग करण्यात आल्याचे सांगितले. तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने संबंधितांना नोटीस काढून नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे वेंगुर्लेकर यांनी सांगितले.
अभियंत्यांचे पठडीतील उत्तर
राष्ट्रीय महामार्ग अभियंता अभिजीत झेंडे यांनाही याबाबत विचारणा करण्यात आली. त्यांनी याबाबत संबंधित ठेकेदार असणाऱ्या कंपनीला विचारणा करून माहिती घेऊन सांगतो, असे पठडीतले उत्तर दिले.