मिरजोळेतील शेतजमिनीमध्ये मोठे भूस्खलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:22 AM2021-06-17T04:22:12+5:302021-06-17T04:22:12+5:30
रत्नागिरी : सुमारे १४ वर्षे सुरू असलेले मिरजोळेतील भूस्खलन यंदाही शेतकऱ्यांच्या नशिबी आले असून, दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतजमीन ...
रत्नागिरी
: सुमारे १४ वर्षे सुरू असलेले मिरजोळेतील भूस्खलन यंदाही शेतकऱ्यांच्या नशिबी आले असून, दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतजमीन १५ ते २० फूट खोल खचली आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे मधलीवाडी-वाडकरवाडीदरम्यानच्या खालचापाट परिसरातील शेतकरी आता चांगलेच हवालदिल झाले आहेत. अपुऱ्या निधीमुळे गेली तीन वर्षे याबाबतच्या उपाययोजना रखडल्या असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त कला जात आहे.
सततच्या भूस्खलनामुळे येथील शेती
संकटात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने येथील
शेतजमिनीत सुमारे १५-२० फूट खोल खचली. वर्षागणिक येथील एक-एक
शेतकऱ्याची जमीन नामशेष होत असल्याचे गंभीर येथे दिसत चित्र आहे. पंधरा वर्षात आतापर्यंत लागवडीखालचे ६ ते ७ एकर क्षेत्र हातचे गेले आहे.
येथील नदीच्या
प्रवाहाने आपला मार्ग बदलल्यामुळे एका बाजूकडील शेतजमीन धोक्यात येऊ लागली.सन २००६ पूर्वीपासून येथील या प्रकाराला सुरूवात झाली. २००६ मध्ये तर याठिकाणी मोठे भूस्खलन झाले. त्यात ५-६ शेतकऱ्यांची
शेत जमीन नामशेष झाली. त्यावेळी बाधित असलेले सुमारे २ एकर क्षेत्र आता दरवर्षीच्या भूस्खलनामुळे सुमारे ६ ते ७ एकर इतके वाढले आहे.
सातत्याने घडणाऱ्या या प्रकाराची दखल घेत भूवैज्ञानिकांनी पाहणी केली. त्यांच्या अहवालानुसार प्रशासन स्तरावरून
काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या.
सन २०१९ मध्ये पाटबंधारे विभाग स्तरावरून येथील १ कोटी ३५ लाखांचा
प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव जिल्हा महसूल विभागाकडे
पाठवण्यात आला होता. मात्र अपुऱ्या निधीमुळे हा प्रस्ताव थांबला होता.
त्यानंतर आपत्ती पूर निधीतून भूस्खलन रोखण्याच्या उपाययोजनांसाठी
विशेष प्राधान्याने कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले
होते त्यासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव सादर झाला आहे. मात्र निधीअभावी अजूनही काम रखडले आहे.
हे भूस्खलन रोखण्यासाठी गेली तीन वर्षे कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने सातत्याने भूस्खलन सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या भूस्खलनामध्ये येथील भाऊ भाटवडेकर
यांची शेतजमीन खोलवर खचली आहे. त्यांचे शेत उद्ध्वस्त झालेले आहे.
आणखी अतिवृष्टी झाल्यास लगतच्या काही शेतकऱ्यांच्या जमिनींनाही मोठा धोका
आहे. मात्र त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.