जवान जयेंद्र तांबडे यांना अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:13 PM2018-07-04T23:13:51+5:302018-07-04T23:14:02+5:30
चिपळूण : चीन सरहद्दीवर अरुणाचल प्रदेश येथे लष्करी सेवा बजावताना हृदयविकाराने निधन झालेले जवान जयेंद्र राजाराम तांबडे (३४) यांना ताम्हणमळा येथे बुधवारी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी पोलिसांकडून सलामी आणि प्रशासनातर्फे पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या पार्थिवास मानवंदना देण्यात आली.
मंगळवारी रात्री उशिराने ताम्हणमळा येथे जयेंद्र तांबडे यांचे पार्थिव आणण्यात आले. तांबडे परिवाराला सैनिकी परंपरेचा वारसा लाभला आहे. तांबडे यांचे चुलत बंधूही सैन्यात आहेत. त्यांनी व त्यांच्या परिवाराने या प्रसंगाला धीराने तोंड दिले. बुधवारी सकाळी ११ वाजता ताम्हणमळा येथील स्मशानभूमीत जवान जयेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले, तहसीलदार जीवन देसाई, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, सभापती पूजा निकम, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, दशरथ दाभोळकर व तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. अंत्ययात्रेवेळी ‘जयेंद्र तांबडे अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. ताम्हणमळा स्मशानभूमीत रत्नागिरीहून आलेल्या पोलीस पथकाने सलामी दिली. यानंतर पोलीस व प्रशासनातर्फे पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या जवानाला हे वीरमरणच आले आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या आणि श्रध्दांजली वाहिली.