हापूसचा हंगाम अंतिम टप्यात

By admin | Published: May 14, 2016 11:55 PM2016-05-14T23:55:32+5:302016-05-14T23:55:32+5:30

२० मेपासून समाप्ती : अन्य राज्यांतूनही आंब्याची आवक सुरु

Last season of Hapusa season | हापूसचा हंगाम अंतिम टप्यात

हापूसचा हंगाम अंतिम टप्यात

Next

रत्नागिरी : जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असलेला आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. कोकणातून बुधवारी वाशी मार्केटला ९२ हजार पेट्या विक्रीस गेल्या होत्या. येत्या २० मेपासून हापूस आंबा हंगाम संपणार असला, तरी कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथून आंब्याची आवक सुरू झाली आहे.
गेल्या पाच वर्षात हापूसला विविध नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बागायतदार हवालदिल झाला आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा निम्मी पर्जन्यवृष्टी झाल्याने हंगामाच्या आधी आलेल्या मोहोराची शेतकऱ्यांनी चांगल्याप्रकारे जपणूक केल्यामुळेच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात आला. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत शेतकऱ्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतात. शिवाय खर्चही भरपूर करावा लागतो.
आंबा पिकासाठी लागणारी खते, मोहोर, फळे संरक्षणार्थ वापरण्यात येणारी कीटकनाशके, मजुरी, पॅकिंग, इंधन खर्च, वाहतूक, हमाली, दलाली शिवाय महागाईमुळे वाढलेले दर वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात मिळणारी रक्कम निश्चितच तुटपूंजी आहे. यावर्षी थंडी उशिरा सुरू झाल्याने आंब्याला मोहोरही उशिरा आला. हवेतील गारठ्यामुळे मोहोरप्रक्रिया सातत्याने होत राहिल्याने फळांची गळ मोठ्या प्रमाणात झाली. जेमतेम २५ ते ३० टक्के पीक शिल्लक राहिले.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात विक्रीला आला.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंब्याची आवक चांगली झाली. मात्र, नंतर आंब्याची आवक मंदावली. परंतु, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आवक वाढू लागली. सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसबरोबर पायरी तसेच गुजरात, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथून बदामी, केशर, लालबाग, राजापुरी, बैंगनपल्ली, तोतापुरी आंब्याची आवक वाढली आहे.
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ९० ते ९२ हजार पेट्या दररोज विक्रीला येत आहेत. मात्र, हापूसचा हंगाम आता अंतिम टप्यात आला आहे. ८०० ते २००० रुपये दराने आंबापेटीची विक्री सुरू आहे. कॅनिंगला २५ ते ३० रुपये किलो दराने आंबा खरेदी सुरू आहे. मात्र, उत्पादनात घट झाल्याने आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. २० मेपर्यंत आंबा संपणार असल्याचे आंबा उत्पादकांचे मत आहे. २० मेनंतर किरकोळ स्वरूपात आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. कर्नाटक व अन्य राज्यांतील आंब्याचे आगमन बाजारपेठेत झाले आहे. त्यामुळे हापूसच्या यंदाच्या हंगामाची लवकरच सांगता होणार आहे.
रत्नागिरी हापूस असल्याचे सांगून कर्नाटक हापूसची विक्री करत ग्राहकांची फसवणूक सुरू आहे. गतवर्षी २५ मे रोजी हापूस आंब्याचा हंगाम संपला होता. मात्र, यावर्षी तत्पूर्वीच हापूस हंगाम संपणार आहे. सध्या हापूसच्या शेवटच्या सत्रातील पेट्या वाशी मार्केटला पाठवण्याचे काम सुरु आहे. (प्रतिनिधी)
नुकसानीच : पाच दिवस अगोदर निरोप
गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाच दिवस अगोदरच हापूसचा हंगाम संपुष्टात येणार आहे. यंदा हापूस उशिराने बाजारात दाखल झाला आणि हंगाम लवकर संपत आहे. त्यामुळे हापूसचे यंदाचे वास्तव्य हे खूपच कमी झाले आहे. यंदा हापूसचा दर चढा असला तरीही बागायतदार नुकसानीतच आहेत.
आवक मंदावली
परराज्यातील आंब्याची आवक ही हापूससाठी परतीचे संकेत देणारी पहिली बाब असते. त्यामुळे वाशी मार्केटमध्ये हळूहळू हापूसची आवक मंदावली आहे.

Web Title: Last season of Hapusa season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.