मासेमारी हंगामाचे उरले अखेरचे दाेनच दिवस, नौका किनारी घेण्यासाठी मच्छिमारांची लगबग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 12:16 PM2023-05-30T12:16:21+5:302023-05-30T12:16:39+5:30
यंदाच्या या हंगामात शेवटच्या ३ महिन्यात मच्छिमारांची घोर निराशा
रत्नागिरी : खोल समुद्रातील मासेमारी व्यवसाय १ जून ते ३१ जुलैपर्यंत बंद राहणार आहे. पावसाळी हंगामामुळे दोन महिन्यांसाठी खोल समुद्रातील मासेमारी दोन दिवसांनंतर बंद राहणार असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश मासेमारी नौका समुद्रकिनारी सुरक्षित ठिकाणी आणून ठेवण्यात आल्या आहेत.
मार्च, एप्रिल आणि मे हे ३ महिने मासेमारीकरिता महत्त्वाचे समजले जातात. या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मासळी मिळते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत मासळीला चांगला दर मिळतो. मात्र, यंदाच्या या हंगामात शेवटच्या ३ महिन्यात मच्छिमारांची घोर निराशा झाली आहे. कारण यावेळी अनेकदा वातावरणातील बदलामुळे बहुतांश नौका किनाऱ्यावरच ठेवण्यात आल्या होत्या. तसेच मासे मिळण्याचे प्रमाणही फार कमी असल्याने मच्छिमारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच शासनाने १ जूनपासून मासेमारी व्यवसाय बंद होणार असल्याने हा हंगाम निराशाजनक ठरला आहे.
जिल्ह्यात मासेमारी बंद होणार असून, मच्छिमारांनी आवराआवर सुरू केली आहे. मच्छिमार नौका किनाऱ्याला आणून लावण्याचे काम सध्या सुरू आहे. यावर्षी सुमारे दोन महिने म्हणजेच ६१ दिवस मासेमारी बंद राहणार आहे. १ ऑगस्टपासून पुन्हा मासेमारीला सुरुवात होणार आहे. जून आणि जुलै हे दोन महिने मत्स्यबीज वाढीचे असल्यामुळे या कालावधीत मासेमारी बंदी केली जाते.