गेल्यावर्षी कोरोनाने, यंदा लालपरीने अडविली पंढरीची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 01:34 PM2021-11-18T13:34:48+5:302021-11-18T13:34:48+5:30
मेहरुन नाकाडे रत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे शासकीय निर्बंध जारी होते. यावर्षी रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथिल झाले असले तरी कर्मचाऱ्यांच्या ...
मेहरुन नाकाडे
रत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे शासकीय निर्बंध जारी होते. यावर्षी रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथिल झाले असले तरी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे कार्तिकी एकादशीनिमित्त एकही गाडी पंढरपूरला जाऊ शकलेली नाही. यामुळे रत्नागिरी विभागाच्या उत्पन्नावर परिणाम तर झालाच शिवाय भक्तांचाही हिरमोड झाला.
कोरोना रुग्णसंख्या घटल्याने शासकीय नियमावली शिथिल केल्यामुळे भाविकांनी पंढरपूरला जाण्याचे निश्चित केले होते. खेड, दापोली, देवरुख, लांजा आगारातून बारा जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे एसटी पाठविणे शक्य नसल्याने गाड्यांच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी भरलेले पैसे रत्नागिरी विभागाकडून परत देण्यात आले आहेत. दोन वर्षांत पंढरपूर यात्रेसाठी बसेस जाऊ न शकल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
एसटीला २०१९ ला ६२ लाखांचे उत्पन्न
- २०१९ साली कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरी विभागातून एकूण १२० जादा गाड्या पंढरपूरला सोडण्यात आल्या होत्या.
- विभागातून १२० जादा गाड्यांमुळे ६२ लाख १५ हजार ३० रुपयांचे उत्पन्न विभागाला लाभले होते.
- २०२० साली कोरोनामुळे तर यावर्षी एसटी कर्मचारी संपामुळे पंढरपूरसाठी एकही गाडी जाऊ शकलेली नाही.
पावसाळ्यात शेतीची कामे असल्याने एकादशीसाठी पंढरपूरला जाऊ शकत नाही. परंतु, कार्तिकी एकादशीला आवर्जून जातो. गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे जाता आले नाही, यावर्षी जाण्याचे निश्चित केले होते. पैसेही भरले होते. परंतु, एसटी कर्मचारी संपामुळे एसटीच बंद असल्याने यावर्षीही माउलीचे दर्शन शक्य झाले नाही. - रोहित पाटील, देवरुख
कोरोनाचे विघ्न बऱ्यापैकी सरल्यामुळे माउलीच्या दर्शनासाठी कुटुंबीयांसह जाण्याची तयारी केली होती. ऐनवेळी एस.टी. कर्मचारी कामबंद आंदोलनामुळे एसटीच बंद आहे. त्यामुळे श्री माउलीच्या दर्शनाला जाण्याची संधी हुकली. परंतु, एसटी सुरू होताच नक्की जाणार आहे. लवकर संप मिटावा, अशी अपेक्षा आहे. - कल्पेश माने, राजापूर
पैसे परत केले
कार्तिकी एकादशीला जिल्ह्यातील अनेक भाविक पंढरपूरला जात असतात. कोरोनामुळे गतवर्षी शक्य झाले नाही. यावर्षी बारा जादा गाड्यांचे आरक्षण प्रवाशांनी केले होते. आगाऊ रक्कमही भरली होती. मात्र, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे बसेस बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांनी आरक्षणासाठी भरलेली रक्कम परत करण्यात आली. - प्रमोद जगताप, प्रभारी विभागनियंत्रक