लोटेतील केन कंपनीला आग, कोट्यवधींची हानी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 08:19 PM2018-09-08T20:19:39+5:302018-09-08T20:20:26+5:30
कंपनीचा संपूर्ण प्लँट बेचिराख झाला असून, गोदामात विक्रीसाठी तयार असणारा मालही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जवळपास अंदाजे दीड कोटींहुन अधिक वित्तहानी झाल्याचे वर्तविण्यात येत आहे.
आवाशी : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील केन केमिकल प्रा. लि. या कंपनीला शनिवारी सकाळी अकरा वाजता लागलेल्या आगीत कंपनीचा संपूर्ण प्लँट बेचिराख झाला असून, गोदामात विक्रीसाठी तयार असणारा मालही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जवळपास अंदाजे दीड कोटींहुन अधिक वित्तहानी झाल्याचे वर्तविण्यात येत आहे.
कंपनीचे मालक कुंदन मोरे (रा. खेड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सत्रात कंपनीची उत्पादन प्रक्रिया सुरु होती. अकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांचा तयार माल साठवून ठेवणाºया गोडाऊनच्या चौथ्या मजल्यावरील एका रिकाम्या ड्रमला किरकोळ आग लागली. बहुधा इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने ती लागली असावी असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. ही आग किरकोळ स्वरुपाची होती.
कंपनीतील अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने ती विझविण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र आगीपर्यंत यंत्रणा पोहचण्यात अडचणी येत होत्या. म्हणून त्यांनी त्यांच्या कंपनीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला बोलावण्यासाठी कंपनीतूनच धावत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मोरे यावेळी दोनदा धावता धावता तोल जाऊन पडले. त्यामुळे कंपनीतील एका कर्मचाऱ्याने अग्निशमन केंद्र गाठून आगीची माहिती दिली.
अग्निशमन यंत्रणा दाखल होईपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले. आग सर्वत्र पसरली गेली आणि यामध्ये त्यांच्या गोडावूनमधील तयार माल (ड्रम - बॅग्ज) आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. प्लॅन्टच्या छतावरील पत्रे, पाईप इतर साहित्यही पूर्णपणे जळाले.