लोटेत कंपनी व्यवस्थापकाची आत्महत्या-कंपनी आवारातच गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 06:06 PM2019-02-13T18:06:13+5:302019-02-13T18:06:36+5:30
लोटे - परशुराम, ता. खेड औद्योगिक वसाहतीतील दिपचंद केमिकल्स प्रा. लि. या कंपनीच्या व्यवस्थापकाने कंपनी आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे
आवाशी : लोटे - परशुराम, ता. खेड औद्योगिक वसाहतीतील दिपचंद केमिकल्स प्रा. लि. या कंपनीच्या व्यवस्थापकाने कंपनी आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता निदर्शनास आली. संदीप संताराम पांडे (३०, पिरलोटे) असे त्या व्यवस्थापकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळ व लोटे पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यवस्थापक पांडे व त्याचे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून याच कंपनी आवारात घरवजा झोपडी करुन राहत होते. संदीप पांडे हे लोटे परिसरात जन्मापासून राहत असून हे कुटुंब मूळ उत्तर प्रदेश येथील आहे. त्यांचे वडील व ते दिपचंद कंपनीत एकत्र काम करतात. काही दिवसांपूर्वीपासून ते सध्या पिरलोटे येथील एका अपार्टमेंटमध्ये एकत्र कुटुंबात राहतात. मयत व्यवस्थापक हे विवाहीत असून त्यांना दोन मुले आहेत.
आज सकाळी संदीप पांडे व त्यांचे वडील हे दोघे एकत्र कंपनीत आले. या कंपनीत एकूण चार कामगार काम करीत आहेत. सकाळच्या सत्रात नेहमीप्रमाणे येणारा कामगारांसाठीचा चहा आला असता तो घेण्यासाठी संदीप हे कोठे आहेत याची एकमेकाला विचारणा सुरु झाली. याचवेळी अधिक शोधाशोध केली असता त्याचे वडील पूर्वी ज्या झोपडीवजा घरामध्ये रहायचे, त्या डावीकडील खोलीत संदीप यांनी गळफास घेतल्याचे नजरेस आले.
याची माहिती लोटे पोलीसांना देऊन त्यांना प्रथम परशुराम रुग्णालयात दाखल केले असता त्याला मयत घोषीत करण्यात आले. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृत्यूदेह कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.