लांजात दारुभट्टीवर छापा, दोघेजण अटकेत : पावणे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:27 AM2017-11-11T10:27:29+5:302017-11-11T10:34:08+5:30
लांजा तालुक्यातील झापडे - पवारवाडी येथील जंगलमय भागात गावठी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकत पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी बाळकृष्ण वामन वामनसे (४९) व तुकाराम गणू कुंभार (४८) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लांजा/रत्नागिरी ,दि. ११ : लांजा तालुक्यातील झापडे - पवारवाडी येथील जंगलमय भागात गावठी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकत पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी बाळकृष्ण वामन वामनसे (४९) व तुकाराम गणू कुंभार (४८) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
झापडे - पवारवाडी येथील जंगलमय भागात गावठी दारूची भट्टी लावली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक प्रणय अशोक व अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांनी पथक लांजा येथे रवाना केले होते़
उंबऱ्याचा पऱ्या या ठिकाणी बाळकृष्ण वामनसे व तुकाराम कुंभार हे दारू निर्मिती करताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी ही भट्टी बाळकृष्ण वामनसे यांची असल्याचे समोर आले.
त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे २०० लीटर इतके ३० बॅरलमध्ये साठवलेले गूळ व नवसागर मिश्रीत रसायन, १३५ लीटर गावठी दारू, पाण्याचा पंप व भट्टीचे साहित्य असे मिळून १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांच्या विरोधात लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस, सहाय्यक पोलीस फौजदार विष्णू नागले, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील पंडित, राकेश बागुल, दत्ता कांबळे यांनी केली.