जागतिक नेत्रदान दिनी मोबाईल अॅपचा शुभारंभ
By admin | Published: June 7, 2016 09:41 PM2016-06-07T21:41:36+5:302016-06-08T00:13:07+5:30
सह्याद्री निसर्ग मित्र : गेल्या वर्षभरात नेत्रदान करणाऱ्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा होणार गौरव
चिपळूण : दि. १० जून जागतिक नेत्रदान दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेतर्फे चिपळूणमध्ये हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात ज्या व्यक्तींनी नेत्रदान केले आहे, त्यांच्या नातेवाईकांचा खास गौरव एका कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्याचबरोबरच सह्याद्रीच्यावतीने नेत्रदानाबाबत मोबाईल अॅन्ड्रॉइड अॅप विकसित करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ यावेळी करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, १० जून रोजी सायंकाळी ६ वाजता, सह्याद्री निसर्ग मित्र, ११, युनायटेड पार्क, मार्कंडी, चिपळूण येथे होणार आहे. नेत्रदान करण्याची इच्छा नोंद केली असली तरी मृत्यूनंतर जवळच्या नातेवाईकांनी ती इच्छा पूर्ण केली, तरच यशस्वी नेत्रदान होते. याचा विचार करता मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांनी दु:खाच्या काळात सामाजिक भान राखत ही जबाबदारी पार पाडावी. नेत्रदान ही अंधांसाठी एक महान उपलब्धी असते, याचा विचार करून हा खास गौरव करण्यात येणार आहे.
सह्याद्रीच्या वतीने नेत्रदानाबाबत मोबाईल अॅन्ड्रॉइड अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून नेत्रदान संकल्प नोंद करता येईल, तसेच प्रत्यक्ष नेत्रदानाच्या वेळी थेट सह्याद्रीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधता येईल. यावर्षी यशोधन लोवलेकर यांनी सह्याद्रीसाठी नेत्रदानाचा लोगो बनवला आहे. तो ट्रेडमार्क नोंदणीखाली नोंद करण्यात आला आहे.
जागतिक नेत्रदान दिनानिमित्त चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्रदान जागृती करण्यात येत आहे. प्रत्यक्ष कार्यालयात नेत्रदानाचे अर्ज भरुन तसेच नेत्रदानाच्या वेबसाईटवरून नेत्रदानाची संकल्पपत्र भरावीत. तसेच मोफत उपलब्ध असलेल्या अॅपचा वापर करून मोबाईल फोनवरुन मोठ्या प्रमाणात संकल्पपत्र भरावीत.
सह्याद्री निसर्गमित्र, चिपळूणच्या वतीने व दृष्टीदान आय बँक सांगली व चिपळूणमधील सर्व नेत्रतज्ज्ञ यांच्या सहकार्याने नेत्रदान मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत नेत्रदानातून व्यक्तिना दृष्टी प्राप्त झाली आहे. या दिवशी मोठ्या संख्येने लोकांनी नेत्रदानाचे फॉर्म भरावेत तसेच सायंकाळच्या गौरव समारंभासाठी उपस्थित राहून नेत्रदानात मोलाची कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करावा, असे आवाहन सह्याद्रीच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
या वर्षात कै. वसुधा रघुनाथ जोशी, कै. भाग्यश्री भरत सुतार, कै. गणपत गजानन गमरे, कै. गंगाधर श्रीपाद भिडे, कै. काशिनाथ सदाशिव वासूरकर, कै. शैलजा सुरेश जोशी, कै. जयंत विष्णू जोशी, कै. सुलोचना विश्वनाथ वाडेकर यांचे नेत्रदान झाले आहे.