मंडणगडात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ माेहिमेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:52 AM2021-05-05T04:52:36+5:302021-05-05T04:52:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या मोहिमेला मंडणगड तालुक्यात दि. ३ मे रोजी प्रारंभ करण्यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या मोहिमेला मंडणगड तालुक्यात दि. ३ मे रोजी प्रारंभ करण्यात आला. यासाठी ८६ पथके कार्यरत करण्यात आली असून, तालुक्यातील सर्व ४९ ग्रामपंचायतीत काम सुरू केल्याची माहिती गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी दिली. यामुळे बाधितांना वेळेवर उपचार मिळणार असून, जिवावर बेतणारे प्रसंग टाळता येणार आहेत.
गृहभेटी देणाऱ्या या विशेष पथकात ग्राम कृती दलाचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोलीसपाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक दररोज कमीत कमी ५० कुटुंबांना भेटी देणार आहे. कोरोनाबाबत जागृती आणि मार्गदर्शक सूचना देण्यात येत असून, गृह अलगीकरणात कसे असावे याबाबत माहिती देण्यात येत आहे. नागरिकांच्या मनात असलेली भीती घालविणे, लसीकरणाची आवश्यकता, तसेच उपलब्ध असलेली उपचार पद्धती यावर सविस्तर माहिती देण्यात येत आहे. तालुक्यात ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढला असल्याने या मोहिमेमुळे त्याची साखळी तोडण्यास मदत होणार आहे.
................................
मंडणगड तालुक्यात नागरिकांची कर्मचाऱ्यांतर्फे आराेग्य तपासणी करण्यात आली.