रत्नागिरीत बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 05:20 PM2018-05-21T17:20:04+5:302018-05-21T17:20:04+5:30
संकल्पना भिन्न शिवाय प्रश्नही असंख्य असतात. या शिबिरातील मुले स्वत:च बालनाट्य बसवतील, अशी खात्री असल्याचे प्रशिक्षक व नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य सुरेश गायधनी यांनी सांगितले.
रत्नागिरी : एका दिवसात माणूस घडत नाही. परंतु उत्तम कलाकार हा पुढे जातोच. अभिनय कला असून, त्यावर आई-वडिलांप्रमाणे प्रेम करा, त्याच्याशी मैत्री करा, जेणेकरून त्याचे सर्व कंगोरे कळले पाहिजेत. आताची मुलं खूप हुशार आहेत. त्यांच्या कल्पना भन्नाट असतात. त्यांच्या पाठांतराचा वेग अफाट आहे. संकल्पना भिन्न शिवाय प्रश्नही असंख्य असतात. या शिबिरातील मुले स्वत:च बालनाट्य बसवतील, अशी खात्री असल्याचे प्रशिक्षक व नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य सुरेश गायधनी यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात गायधनी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर योगिता टाईपरायटरच्या संचालिका आशा पंडित, नियामक मंडळाचे माजी सदस्य अॅड. देवेंद्र यादव, ज्येष्ठ रंगकर्मी आप्पा रणभिसे, मराठी नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, उपाध्यक्ष राजकिरण दळी, कार्यवाह आसावरी शेट्ये आदी मंडळी उपस्थित होती.
नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी शिबिर आयोजित करण्यामागील उद्देश्य विषद केला. पालकांच्या सूचनेवरूनच शिबिर आयोजित केले असल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ रंगकर्मी आप्पा रणभिसे यांनी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
उद्घाटक आशा पंडित यांनी नाट्य परिषदेतर्फे चांगला उपक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा इंदुलकर यांनी केले. नाट्य परिषदेच्या कार्यवाह आसावरी शेट्ये यांनी आभार मानले.