लांजात शासकीय, खासगी कोविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:30 AM2021-04-15T04:30:19+5:302021-04-15T04:30:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लांजा : कोरोनाची दुसरी लाट प्रभावी होत असल्याने पूर्व देवधे येथे असलेले शासकीय कोविड केअर सेंटर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लांजा : कोरोनाची दुसरी लाट प्रभावी होत असल्याने पूर्व देवधे येथे असलेले शासकीय कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच छोटूभाई देसाई हे एक खासगी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी कोरोनाच्या कालावधीत देवधे येथील इंग्लिश मीडियम शाळा येथे शासकीय कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. तेथे जवळपास ४१६ कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले होते. या कोविड केअर सेंटरमध्ये दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले तसेच वयोवृद्ध रुग्ण यांच्यावर उपचार करण्यात येत नव्हते. लक्षणे नसलेले तसेच गंभीर नसलेल्या कोरोना रुग्णांवर देवधे येथे उपचार करण्यात आले होते. सध्या तालुक्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या धडकी भरवणारी आहे. यामध्ये नाॅर्मल व लक्षणे नसलेले, मात्र कोरोना रुग्णांचा आकडा मोठा आहे. या सर्वांवर एकाच ठिकाणी उपचार केले तर मात्र बेड अपुरे पडतील. याचा विचार करून गंभीर असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत, त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात यावेत, शासकीय जिल्हा रुग्णालयावर ताण येऊ नये यासाठी तालुका स्तरावर पूर्वी असलेली कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वित केल्याने रुग्णावर वेळेत उपचार करणे सोपे झाले आहे.
लांजा तालुक्यातील देवधे येथे असलेली इंग्लिश मीडियम शाळा सर्व सोयीनी सुसज्ज असल्याने येथे तालुक्यातील शासकीय कोविड केअर सेंटर करण्यात आले होते. आता या ठिकाणी ५० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे सध्या कोरोनाचे २४ रुग्ण उपचार घेत आहेत. येथे एक ऑक्सिजन बेडही आहे. याखेरीज छोटूभाई देसाई हे खासगी कोविड सेंटरही सुरू करण्यात आले आहे. येथे १६ बेडची व्यवस्था करण्यात आली असून, सध्या येथे कोरोनाचे दोन रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी ऑक्सिजनचे दोन बेड आहेत.