सामाजिक सलोख्यासाठी नेतृत्व करावे
By admin | Published: August 28, 2014 09:02 PM2014-08-28T21:02:39+5:302014-08-28T22:23:59+5:30
चिपळुणातील शांतता समिती बैठकीत जिल्हाधिकारी यांचे आवाहन
चिपळूण : गणेशोत्सवाबरोबरच आगामी काळात निवडणुका आहेत. त्यामुळे हा काळ शांततेसाठी महत्त्वाचा आहे. या काळासाठी शांतता समितीचा सदस्य महत्त्वाचा घटक आहे. त्यांनी सामाजिक सलोख्यासाठी योग्य नेतृत्व करावे. कोणत्याही अनुचित घटनेमुळे मंडळावर कारवाई होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी केले.
चिपळूण येथील पोलीस वसाहतीच्या बहुउद्देशीय सभागृहात शांतता समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, चिपळूण तहसीलदार वृषाली पाटील, गुहागर तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक अशोक बनकर, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार पाटील यांनी प्रास्ताविक केले व बैठकीचा उद्देश सांगितला. त्यानंतर शांतता समितीच्या सदस्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. पोलीस अधीक्षक डॉ. शिंंदे यांनी महामार्गावर १७ ठिकाणी वाहतूक केंद्र उभारली आहेत. चिपळूण, मार्गताम्हाणे, शृंगारतळी, खेर्डी, सावर्डे येथे वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची दक्षता घेऊन सदस्यांनी केवळ नामधारी न राहता सक्रिय व्हावे. हल्ल्याच्या घटना होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. जुने साकव पडणार नाहीत. शिवाय बॉम्बस्फोट, दहशतवाद याबाबतच्या अफवा पसरणार नाहीत, याची काळजी घ्यावी. हा सण शांततेत पार पाडणे ही सर्वांची जबाबदारी आहे. इको फे्रंडली गणेशोत्सव साजरा करावा तसेच रेल्वे स्टेशन येथे रिक्षांसाठी दरफलक लावावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. (प्रतिनिधी)