राज्यात आघाडी मात्र वाॅर्डात बिघाडा, स्वबळाचा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:34 AM2021-09-25T04:34:51+5:302021-09-25T04:34:51+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नांदत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र ...
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नांदत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र स्वबळावर लढविण्याचा निर्णय मित्रपक्षांनी घेतला आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीतही मित्रपक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राज्यात आघाडी असली तरीही शहरातील वाॅर्डात ‘बिघाडी’च पाहायला मिळणार आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. शहरात एकूण १५ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागातून एक पुरुष व एक महिला उमेदवाराला संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातून दोन उमेदवार निवडले जाणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका मुदतीतच होण्याची शक्यता असून दि. २२ डिसेंबरला नवीन नगराध्यक्ष विराजमान होण्याची शक्यता आहे. आरक्षणानंतर जागा वाटप होणार आहे. राज्यात आघाडी असली तरी सेनेच्या जागा अधिक असल्यामुळे जागा वाटपावरून मित्रपक्षात ‘बिघाडी’ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी सुरू केली आहे.
शिवसेनेचे वर्चस्व
नगरपरिषदेमध्ये २३ उमेदवार शिवसेनेचे असल्याने वर्चस्व सेनेचे आहे. राष्ट्रवादीचे चार उमेदवार आहेत. सहाजिकच जागा वाटपावरून युती होणे अशक्य आहे. कार्यकर्त्यांना नाराज करणे कुठल्याच पक्षाला मान्य नाही. त्यामुळे राज्याचा पॅटर्न रत्नागिरीत लागू होणे अशक्य असून स्वतंत्र निवडणुका अटळ आहेत.
नगरसेवक निवडणूक
शहरात १५ प्रभाग असून प्रत्येक वाॅर्डातून एक पुरुष व एक स्त्री उमेदवाराला संधी मिळणार आहे. त्यामुळे ३० उमेदवारांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र, नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र निवडणूक किंवा नगरसेवकांतूनच नगराध्यक्ष निवडणूक याबाबतचा निर्णय मात्र प्रलंबित असून, जनतेमध्येही उत्सुकता आहे.
दोन मते द्यावी लागणार
पंधरा प्रभागासाठी दोन उमेदवार निवडण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रत्येकी दोन मते द्यावी लागणार आहेत. नगराध्यक्ष निवडणूक जर स्वतंत्र झाली तर मात्र तिसरे मतही नागरिकांना द्यावे लागणार आहे. मात्र याबाबतच निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
नागरिकांचा लागतो विकासाला हातभार
प्रत्येक शहराचा नागरिक हा करदाता असल्यामुळे विकासाला हातभार नागरिकांचा लागतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. विकासाचा अजेंडा घेऊन पक्ष आश्वासने देत असतात. नागरिकांनी याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
- प्रमोद कोनकर.
जनकल्याणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक प्रतिनिधी नागरिकांमधून निवडून दिला जातो. मात्र, निवडून आलेनंतर त्यांना विकासाचा विसर पडतो. अजेंड्यावरील विकास दूरच राहतो.
- दिलावरअली नेवरेकर
स्वबळावर लढण्याची तयारी
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे आमचे मित्र असलेल्या पक्षांकडून योग्य जागांवर मागणी झाली, दोन्ही पक्षांत जागा वाटपामध्ये तडजोड झाली तरच एकत्र; अन्यथा ‘स्वबळावर’ निवडणुका लढविणार आहोत. जागा वाटपावेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणार आहोत.
- बिपीन बंदरकर, शहराध्यक्ष, शिवसेना
राज्यात महाविकास आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर निवडणुकांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. निवडणुकांसाठी मित्र पक्षाकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव नाही. ‘स्वबळावर’ निवडणुका लढविण्याचा निर्णय विचाराधीन आहे. ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन नक्की घेऊ.
- बशीर मुर्तूझा, प्रांतीक सदस्य, राष्ट्रवादी पक्ष
शहराची स्थिती जनता पाहत आहे. शहराला दोन नगराध्यक्ष लाभले; परंतु जनतेला न्याय मात्र मिळालेला नाही. विकासाचा अजेंडा घेऊनच भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे नगरपरिषद निवडणूक लढविणार आहे. याबाबत वरिष्ठ तसेच स्थानिक नेत्यांसमवेत विचारविनिमय सुरू आहे.
- सचिन करमरकर, शहराध्यक्ष, भारतीय जनता पक्ष