शिवसेना सत्तेसाठी लाचार पक्ष : सुप्रिया सुळे, दापोली येथील सभेमध्ये टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:53 PM2017-11-17T13:53:58+5:302017-11-17T14:13:46+5:30
शिवसेना सत्तेसाठी लाचार बनली आहे. शिवसेना-सत्तेत असली तरीही भाजपने शिवसेनेला लाथाडले आहे. परंतु, शिवसेना भाजपला विरोध करु शकत नाही. कारण सेनेच्या वाघाचं आता मांजर बनलं असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी दापोली येथील सभेमध्ये केली.
दापोली : शिवसेना सत्तेसाठी लाचार बनली आहे. शिवसेना-सत्तेत असली तरीही भाजपने शिवसेनेला लाथाडले आहे. परंतु, शिवसेना भाजपला विरोध करु शकत नाही. कारण सेनेच्या वाघाचं आता मांजर बनलं असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी दापोली येथील सभेमध्ये केली.
भाजपकडून शिवसेनेला दुय्यम स्थान दिले जात आहे. सरकारच्या जाहिरातीत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचा फोटो दाखवला जातो. मात्र, सत्तेत भागिदार असलेल्या शिवसेनेच्या उध्दव ठाकरे यांचा छोटा फोटोसुध्दा दाखवला जात नाही.
देशातील जनतेकरिता बुलेट ट्रेनची गरज नाही तरीसुध्दा बुलेट ट्रेन करण्याचा घाट घातला जातो. मात्र, या बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्र राज्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज होणार आहे. त्याही परिस्थितीत मुंबई-गुजरात बुलेट ट्रेन केली जात आहे.
महाराष्ट्रात २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार आले. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास आपण बुलेट ट्रेन रद्द करु. ग्रामीण जनतेची जीवनदायिनी असलेल्या एस. टी.ला आवश्यक तो निधी देऊन तिची स्थिती सुधारु.
राज्यातील ग्रामीण जनतेला बुलेट ट्रेनची नव्हे एस. टी.ची गरज आहे. बुलेट ट्रेनचा प्रवास श्रीमंत लोकच करतील. मात्र, एस. टी.ने माझ्या राज्यातील गोरगरीब जनता प्रवास करते. एस. टी. हे त्यांच्या दळणवळणाचं व विकासाचं मुख्य साधन आहे. परंतु, भाजप सरकार भांडवलदार गुजराती जनतेला खूष करण्यासाठी बुलेट ट्रेन करु पाहत आहे.
जनतेच्या मुळावर उठलेल्या सरकारला २०१९च्या निवडणुकीत गाडून टाका. या सरकारवर जनतेचा विश्वास राहीला नाही. मुजोर व फसवे सरकार जनतेच्या हितासाठी नव्हे भांडवलदारांच्या हितासाठीच काम करीत आहे. यादरम्यान कधी नव्हे इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारच्या काळात वाढल्या आहेत.
अच्छे दिन येणार असे सांगितले होते. भाजप सरकारचे हेच का अच्छे दिन? असा सवाल त्यांनी केला. नोटा बंदीने व जीएसटीमुळे जनतेचे रोजगार गेले. अनेकजण बेकार म्हणून पुढे येत आहेत.
देशाच्या पंतप्रधानाला जनतेच्या हिताच्या योजनेकडे पाहायला वेळ नाही. विदेश दौरे करण्यातच पंतप्रधान व्यस्त आहेत. विदेशी दौऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचे त्या म्हणाल्या.
रामदास कदम यांच्यावर आमदार संजय कदम यांची टीका
यावेळी शिवसेना नेते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर आमदार संजय कदम यांनी जोरदार हल्ला चढवत पर्यावरणमंत्री कदम हे लोकांना लुगडं, ढोलक्या वाटण्याचे काम करीत आहेत. मुलाला उमेदवारी मिळावी, आपला मुलगा आमदार व्हावा म्हणून ढोलक्या-टाळ, लुगडं वाटण्यापेक्षा त्यांनी विकासकामे करावीत. रामदास कदम यांनी आपल्या खात्याचे किती रुपये खर्च केले ते जनतेसमोर आणावे, असे आव्हानच संजय कदम यांनी यावेळी बोलताना दिले.