कोरोना खर्चासाठी नेत्यांचे मानधन, कर्मचाऱ्यांचा पगार उसना घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:29 AM2021-04-15T04:29:41+5:302021-04-15T04:29:41+5:30
देवरुख : राज्यात ६०,००० पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येत असून, ३०० च्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत आहे. आवश्यक असलेला ...
देवरुख : राज्यात ६०,००० पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येत असून, ३०० च्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत आहे. आवश्यक असलेला लॉकडाऊन करु नये म्हणून विरोध, आंदोलने करुन लॉकडाऊन हाणून पाडणे, बेधडकपणे सण साजरे करणे, मास्क न वापरणे सामाजिक अंतर न ठेवणे, या निष्काळजीपणाची जबर किंमत सर्वांनाच मोजावी लागणार आहे. वाढत असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे सरकारी खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे व अजूनही वाढणार आहे. यावर उपाय म्हणून आपत्कालीन परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने सर्व नेत्यांचे महिन्याचे मानधन व सर्व कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार उसना घ्यावा व व्याजासह दिवाळीत परत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी केली आहे.
व्यापारी, शेतकरी, कामगार व हॉटेल व्यावसायिक यांनी वर्षभर अनेक कळा सोसल्या आहेत. कोरोना आपत्तीची तीव्रता लक्षात घेता राजकीय पुढारी व कर्मचारी एखाद्या महिन्याचे मानधन व पगार व्याजासह उशिरा मिळणार असेल तर निश्चित कर्तव्य म्हणून कळ सोसतील, असा विश्वास आर्ते यांनी व्यक्त केला आहे. प्रचंड प्रमाणावर होत असलेल्या खर्चासाठी तातडीने पैसे उपलब्ध करण्यासाठी अशा पद्धतीची उपाययोजना राबविण्यात यावी. यासाठी सर्वांनीच आग्रही मागणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
व्यापारी, शेतकरी, कामगार व हॉटेल व्यावसायिक, संस्था, संघटना आपापल्या पद्धतीने कोरोना संकटाला सामोरे जात असताना नेते व कर्मचाऱ्यांनीही काही कालावधीसाठी थोडी कळ सोसून या संकटात एकमेकांना मदत करावी, अशी अपेक्षा आर्ते यांनी व्यक्त केली आहे.