Ratnagiri Politics: चिपळुणात आधीचे विरोधक आता एकमेकांचे पक्के मित्र, सख्खे सोयरे
By संदीप बांद्रे | Published: March 29, 2024 05:59 PM2024-03-29T17:59:23+5:302024-03-29T18:00:28+5:30
लोकसभा निवडणुकीतही रंगत कायम : पक्षफुटीमुळे सारेच घायाळ
संदीप बांद्रे
चिपळूण : एकेकाळी राजकीयदृष्ट्या एकमेकांचे विरोधक मानले जाणारे चिपळूणचे नेते आज लोकसभेआधीच पक्के मित्र, तर काही सख्खे सोयरे बनले आहेत. आता ऐन लोकसभा निवडणुकीत नाते अन् मैत्री जपणार की पक्षाची धुरा वाहणार, हा प्रश्न कायम असला, तरी सर्वच राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष विभागणीने अक्षरशः घायाळ झाले आहेत. त्यात अजूनही लोकसभेची उमेदवारी निश्चित होत नसल्याने कार्यकर्तेही भेदरलेल्या अवस्थेत सैरावैरा झाले आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत रत्नागिरीपाठोपाठ चिपळूण विधानसभा मतदारसंघाने महत्त्वाची भूमिका बजावली होती, परंतु या निवडणुकीत चिपळूणच्याबाबतीत नेतृत्वापासूनचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
चिपळूण तालुक्यात एकूण मतदार २,६७,८३९ इतके असून, त्यामध्ये पुरुष १,३१,३६८ व स्त्री १,३६,४७१ इतके आहेत. मागील लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी १ लाख ७८ हजार ३२२ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला होता. यात चिपळूण विधानसभा मतदारसंघाचा वाटा होता ५७,२३३ मताधिक्याचा. राऊत यांना ८७,६३०, महाराष्ट्र स्वाभिमानचे उमेदवार नीलेश राणे यांना ३०,३९७, तर काँग्रेसचे नवीनचंद्र बांदीवडेकर यांना १२,४०० मते मिळाली होती. विनायक राऊत यांनी दोन्ही विरोधी उमेदवारांना अक्षरशः धूळ चारली होती.
परंतु त्यावेळी राऊत यांच्यासोबत रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे ठामपणे उभे होते. त्याचवेळी चिपळुणात शिवसेनेची ताकदही अधिक सक्षम होती. चिपळूण तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समितीच्या गणांतून राऊत यांना चांगली साथ मिळाली होती. जिल्हा परिषदेच्या ९ पैकी पाच गट शिवसेनेचे हक्काचे होते. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत फार मोठा बदल दिसून आला. राष्ट्रवादीचे शेखर निकम यांनी सर्वच जिल्हा परिषद गटांत मताधिक्य घेतले होते. एवढेच नव्हे चिपळुणातील पेढे व पेढांबे जिल्हा परिषद गट शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जायचे. या दोन्ही गटांत शिवसेनेचे उमेदवार व माजी आमदार सदानंद चव्हाण हे पिछाडीवर होते. त्यानंतर एकही निवडणूक झाली नसल्याने अजूनही आमदार शेखर निकम हेच किंगमेकर मानले जातात.
खासदार विनायक राऊत यांना मागील लोकसभा निवडणुकीत रत्नागिरीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य चिपळूणमधून मिळाले होते. मात्र, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता राजकीय घडी पूर्णतः विस्कटलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक खासदार राऊत यांनाही सोपी राहिलेली नाही. राज्यातील घडामोडीनंतर आमदार शेखर निकम आणि त्यांचे विरोधक सदानंद चव्हाण यांची ताकद या निवडणुकीत एकवटली जाण्याची शक्यता आहे. तसे पाहिले तर सदानंद चव्हाण आजही मतदारसंघात कायम संपर्कात असतात. तसेच निकम यांच्या विकासकामांचाही झंझावात सुरू आहे. त्यामुळे नात्याने सोयरे असलेल्या या दोन नेत्यांची ताकद शिंदे गटाला अर्थात शिवसेना व भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अर्थात महाविकास आघाडीला चिपळूण तालुक्यात वेगळी ताकद उभी करावी लागणार आहे.
आता लोकसभा निवडणुकीनिमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची घडी पुन्हा बसवली जात होती. अशातच पक्षाचे नेते भास्कर जाधव पक्षांतर्गत नाराजीचा सूर आळवल्याने तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते भेदरून गेले आहेत. खरंतर चिपळूणची जबाबदारी आपसूकच आमदार भास्कर जाधव यांच्याकडेच सोपवली जाण्याची शक्यता आहे. परंतु ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाप्रमुखांसह अन्य पदाधिकाऱ्यांचे दुखावलेले मन वेळेत सावरले गेले नाही, तर मात्र ठाकरे गटाला त्याची मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. कारण, नवीन चिन्हाचा स्वीकार मतदार कशापद्धतीने करतात, त्यावर समीकरणे अवलंबून राहणार आहेत.
एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यातील मंत्री आमदार उदय सामंत व चिपळूणचे आमदार शेखर मिकम, माजी आमदार सदानंद चव्हाण हे महायुतीत सहभागी असल्याने शिवसेनेला तालुक्यात तगडी लढत द्यावी लागणार आहे. त्यासाठी एकेकाळी कट्टर विरोधक असलेले माजी आमदार रमेश कदम यांचे आमदार जाधव यांच्याशी नव्याने जुळलेले मैत्रीचे नाते महाविकास आघाडीला कितपत फलदायी ठरते, याकडेही सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. तूर्तास लोकसभेसाठी मतदारांच्या दृष्टीने विचार केला, तर रत्नागिरीपाठोपाठ चिपळूणचीच भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.