अन्य पक्षांचे नेते येऊन नाचले
By admin | Published: September 16, 2016 09:40 PM2016-09-16T21:40:54+5:302016-09-16T23:47:42+5:30
भास्कर जाधव : तुरंबव येथील पुलाच्या उद्घाटनप्रसंगी टीकास्त्र
चिपळूण : माझ्याच गावात माझ्याविरूध्द काहींनी राजकारण करून अन्य पक्षाच्या नेत्यांना आणून नाचवलं. ते नाचलेही पण, त्यांना विकासकामे करता आली नाहीत. ते भाग्य मात्र मलाच मिळालं, असे उद्गार माजी मंत्री व गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी तुरंबव (ता. चिपळूण) येथे काढले.
तालुक्यातील निवळी - तुरंबव-आबीटगाव रस्त्यावरील तुरंबव येथे ५६.५० लाख रुपये खर्चून जीर्ण झालेल्या पुलाच्या जागी बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे उद्घाटन भास्कर जाधव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ग्रामदेवता श्री शारदादेवी मंदिराच्या सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. उद्घाटनानंतर ग्रामपंचायत कार्यालय ते मंदिरापर्यंत ग्रामस्थांनी आमदार जाधव यांना सवाद्य मिरवणुकीने आणले.
केवळ माझ्याच गावात नव्हे; तर या भागातील सर्व गावांमधील विकासकामे माझ्याच माध्यमातून झाली, असा दावा करताना आमदार जाधव यांनी ‘लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना गेल्या ३० वर्षात फूटब्रीज बांधण्याची मागणी अनेक ठिकाणी झाली. परंतु, दूरदृटी ठेवून फूटब्रीजऐवजी मोठे पूल उभारण्यास मी प्राधान्य दिले. त्यातूनच या भागातील आबीटगाव, ओमळी आदी ठिकाणचे पूल झाले. मतदारसंघात वडद - वाघिवरे, गोंधळे - पोसरे, मिरजोळी जुवाड, सावर्डे - दहीवली, आरे राममंदिर, वेळणेश्वर भाटी, खोपी शिरगाव यासारखे अनेक मोठे पूल उभे राहिल्याची उदाहरणेही दिली.
कार्यक्रमाला पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मानसिंग महाडिक, तुरंबवचे माजी सरपंच सुनील जाधव, रवींद्र सुर्वे, बाबाशेठ सुर्वे, चिपळूणचे नगरसेवक समीर जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत जाधव, राजेश सुर्वे, सुमित शिंंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)