वंचित आघाडी, बसपाचा फटका कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:46 PM2019-04-04T23:46:51+5:302019-04-04T23:46:56+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेना-भाजप युती, स्वाभिमान पक्ष व कॉँग्रेस आघाडीच्या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्य लढत ...

Leadership lead, who is the BSP? | वंचित आघाडी, बसपाचा फटका कोणाला?

वंचित आघाडी, बसपाचा फटका कोणाला?

googlenewsNext

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेना-भाजप युती, स्वाभिमान पक्ष व कॉँग्रेस आघाडीच्या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या राजकीय लढाईच्या रिंगणात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी व हिंदू महासभा यांनीही आपले उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे या पक्षांच्या आव्हानाचा खरा फटका प्रमुख तीन उमेदवारांपैकी कोणाला अधिक बसणार याबाबतची उत्कंठा आता वाढली आहे.
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळी सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत व गेल्या वेळी या मतदारसंघात कॉँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात असलेले व यावेळी स्वाभिमानतर्फे निवडणूक लढविणारे नीलेश राणे पुन्हा आमने- सामने आहेत.
कॉँग्रेस आघाडीतर्फे नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच खरी लढत होणार आहे. निवडणुकीतील डावपेच म्हणून काही खेळी नेहमीच खेळल्या जातात. त्यानुसार काही अपक्ष उमेदवारही रिंगणात उभे केले जातात. आपल्याला ज्यांचे सहकार्य मिळणार नाही, अशा मतदारांची मते प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळू न देता ती अपक्ष वा अन्य उमेदवारांकडे कशी वळवता येतील, असा या डावपेचांमागे उद्देश असतो.
रत्नागिरी मतदारसंघात गेल्यावेळी युतीतर्फे लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार विनायक राऊत यांना दीड लाखांचे मताधिक्य मिळाले होते, तर त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघात सेनेचे स्वत:चे मताधिक्य १ लाखावर आले. त्यामुळे या निवडणुकीत या १ लाख मताधिक्यात घट झाली तरीही विनायक राऊत यांना विजयापासून रोखता येणार नाही, असा सेनेचा दावा आहे. तर हे मताधिक्य पोखरण्यासाठी काही अपक्ष व अन्य आघाड्यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची चर्चा आहे.
रत्नागिरी - देवरुख येथील मारूती जोशी हे उमेदवार यावेळी वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. बहुजन समाजात त्यांना मानणारे लोकही आहेत. परंतु ते या मतदारसंघात विजयापर्यंत पोहोचू शकतील काय, हा राजकीय वर्तुळातील महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र, त्यांना मिळणारी मते ही मुख्य पक्षांच्या उमेदवारांची घटणारी मते असू शकतात.
दुसरीकडे बहुुजन समाज पार्टीनेही वेंगुर्ल्याचे किशोर वरक यांना उमेदवारी दिली आहे. बसपाचीही या मतदारसंघात मते आहेत. हिंदू महासभेनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे.

Web Title: Leadership lead, who is the BSP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.