मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला गळती, तज्ज्ञांकडून पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 12:38 PM2024-06-24T12:38:18+5:302024-06-24T12:39:09+5:30

गळती वेळीच राेखण्यात यश न आल्यास हे झरे अजून वाढण्याची भीती

Leakage in Kashedi tunnel on Mumbai-Goa highway, inspection by experts  | मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला गळती, तज्ज्ञांकडून पाहणी 

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला गळती, तज्ज्ञांकडून पाहणी 

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी बोगद्याला पहिल्याच पावसात एक-दोन नव्हे, तर आठ ते दहा ठिकाणी गळती लागली आहे. हे पाणी राेखण्यासाठी ठेकेदाराकडून बोगद्यात पत्रे लावण्यात आले आहेत. तरीही गळती थांबलेली नाही. याबाबत तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली असून, त्यावर ठोस उपाययोजना केली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.

महामार्गावर धाेकादायक ठरणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून दाेन किलाेमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या बोगद्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे एकाच बोगद्यातून लहान वाहनांसाठी वाहतूक सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. या पहिल्याच पावसामध्ये कशेडी बोगद्याला ठिकठिकाणी गळती लागल्याचे समाेर आले आहे.

या बोगद्यात पाण्याचे फवारे वाहनांवर आणि दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत आहेत. या प्रकारामुळे बाेगद्यातून प्रवास करणारे वाहनचालक आणि दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत. बोगद्यातील गळती थांबविण्यासाठी व थेट वाहनांवर पडणारे पाणी रोखण्यासाठी बोगद्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने गळतीच्या ठिकाणी पत्रे लावले आहेत. मात्र, तरीही सिमेंटचे फेन्सिंग फोडून सात ते आठ ठिकाणी पाण्याचे झरे लागले आहेत. बाेगद्यात लागलेली गळती वेळीच राेखण्यात यश न आल्यास हे झरे अजून वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे.

कशेडी बोगद्याला लागलेली गळती व बोगद्यात छतावरून कोसळणारे पाणी या घटनेची काही दिवसांपूर्वी जिओलॉजिकल तज्ज्ञांनी पाहणी केली आहे. ही गळती रोखण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. - संताेष शेलार, मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग.

Web Title: Leakage in Kashedi tunnel on Mumbai-Goa highway, inspection by experts 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.