लोटे औद्योगिक वसाहतीत पाईपलाईनला गळती
By admin | Published: May 18, 2016 11:07 PM2016-05-18T23:07:20+5:302016-05-19T00:13:58+5:30
लोटे परिसर : संबंधित यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष
आवाशी : संपूर्ण राज्य दुष्काळाच्या गर्तेत सापडले असून, अनेकांचे पाण्याविना हाल होत आहेत. लोटे-परशुराम वसाहत व परिसराला पाणीपुरवठा करणारी खेर्डी, चिपळूण एमआयडीसीची पाईपलाईनला मात्र गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी गळती लागली आहे, असे असतानाही संबंधित यंत्रणेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीसह परिसरातील १२ गावांना खेर्डी -चिपळूण येथील एमआयडीसीकडून वालोपे येथून वाशिष्ठी नदीतील पाणी पुरवले जाते. वाशिष्ठी नदीतील पाणी थेट पीरलोटे येथील एमआयडीसीच्या साठवण टाकीत येते. प्रथम त्याच्यावर प्रक्रिया करून ते कारखानदार व १२ गावांच्या ग्रामस्थांना पिण्यासाठी पुरवले जाते.
रासायनिक कारखानदारीमुळे या १२ गावांमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. मात्र, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत या गावातील जनतेनेदेखील पाण्याचा योग्य वापर करण्याचे सुरु केले आहे, तर औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कारखानदारही पाण्याच्या वापरावर कटाक्ष ठेवून आहेत.
फेब्रुवारीपासूनच येथील इंडस्ट्रीयल असोसिएशनने जागरूकता म्हणून ठिकठिकाणी जाहिरात फलक लावले आहेत. प्रत्येक कारखानदाराच्या दालनात याविषयी पाट्या लावण्यात आल्या आहेत. यावरून असे लक्षात येते की, पुरवठादरापेक्षा वापरणारा दक्ष आहे. मात्र, पुरवठादाराला याचे काहीच सोयरसुतक नाही.
ज्या ठिकाणाहून औद्योगिक वसाहत व गावांना पाणीपुरवठा केला जातो, तेथून म्हणजेच पीरलोटे येथून पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. पीरलोटे येथील त्यांच्या पंप हाऊसमागे, महामार्ग पोलीस चौकी, पुष्कर कंपनीसमोर, सुप्रिया कंपनीसमोर, कन्साई कंपनीसमोर, बंद असणारी हरडेलिया कंपनी लगत व अशा अनेक ठिकाणी पाणी दिवसरात्र वाया जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दर सोमवारी दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद असतो. मात्र, दुरुस्तीच्या दिवशी नेमके काय केले जाते, असा प्रश्न पडत आहे. दि. १६ रोजी सोमवार होता आणि मंगळवारीही पाणीपुरवठा बंद होता. मग असे असतानाही गळतीची ठिकाणे कामे तशीच राहावीत, असा सवाल उपस्थित होतो. याकामी जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन येथे होत असलेली पाण्याची गळती थांबवावीे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
तीव्र संताप : शेकडो लीटर पाणी वाया
उर्वरित ठिकाणी भीषण पाणीटंचाई असताना लोटे परशुराम वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली आहे. दररोज शेकडो लिटर पाणी त्यामुळे वाया जात आहे. संबंधित यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याने हे लिकेज अद्याप तरी काढण्यात आलेले नाही. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.