गुहागरात सात दुकाने फोडली
By admin | Published: July 13, 2014 12:25 AM2014-07-13T00:25:19+5:302014-07-13T00:29:03+5:30
२८ हजार रुपय, दुचाकीही चोरली
गुहागर : चिपळूण, रत्नागिरीमध्ये वारंवार होणाऱ्या घरफोड्यानंतर आता चोरट्यांनी गुहागरला लक्ष्य केले आहे. मध्यरात्री गुहागर शहरातील सात दुकाने फोडून २८ हजार रुपयांची चोरी केली आहे तर एक दुचाकीही चोरली आहे. गुहागर शहरात साखळी पद्धतीने एकाचवेळी सात दुकाने फोडल्याची पहिलीच घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेले दोन दिवस रात्र पडणारा पाऊस व शनिवारी गुहागर बाजारपेठ बंद असल्याने चोरट्यांनी नियोजनबद्ध चोरीचा डाव साधला. शनिवारी दुकाने बंद असल्याने आज सकाळी आठनंतर काही दुकानमालक आपल्या दुकानात आले असता दुकानांच्या शटरचे कुलूप तोडलेली दिसल्याने अचंबित झाले. आतील भागातील पैशाचे ड्रॉवर व इतर भाग अस्ताव्यस्त पसरलेला दिसल्याने चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत सुहास गुहागरकर यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये काल रात्री ९ वा. मेडीकल स्टोअर बंद केल्यानंतर रात्री उशिरा रात्री सुवासिनी गुहागरकर, मुलगा धवल व सून अनिता हे झोपी गेले. सकाळी ८ वा. मेडीकल स्टोअरच्या शटरचे कुलूप तोडलेले दिसल्याने पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. यामध्ये दुकानामधील ५ हजार रोख रक्कम चोरीला गेली. डॉ. सुरेश भगवान भाळे यांच्या शिवराम प्लाझा इमारतीमधील मेडीकल स्टोअरही चोरट्यांनी फोडून यामधील १३ हजाराची रोकड लांबवली. माधव रघुनाथ ओक यांच्या दुकानातील ६०० रु.ची चिल्लर, संजय रामदास पवार यांच्या चष्म्याच्या दुकानातील ८५५० रु. चोरले, तसेच सुरेंद्र बहिराराम माळी (३२), परचुरे कॉम्पेक्स, भवरलाल आभयराम चौधरी (४२), शिवराम प्लाझा, प्रशांत सुधाकर रहाटे (२७, तेलीवाडी) आदींच्या दुकानामध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात झाली आहे. व्याडेश्वर तळ्याजवळील विराग भोसले (आरे), दिनेश भोसले यांच्या माडी दुकान फोडून माडीचा आस्वाद चोरट्यांनी घेतल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच एटीएममध्ये काम करणाऱ्या केदार वराडकर याची दुचाकी चोरीला गेली. (प्रतिनिधी)