आमदार, नगराध्यक्षांच्या हाती ‘कल्पनेचा कुंचला’
By admin | Published: May 3, 2016 10:22 PM2016-05-03T22:22:23+5:302016-05-04T01:07:34+5:30
पर्यटन महोत्सव : जनजागृतीची मोहीम वेगात, भिंती रंगवण्याचा आवरला नाही मोह
चिपळूण : रत्नागिरी पर्यटन महोत्सवासाठी चिपळूण नगरी सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी होर्डिंग्ज, स्टिकर व घरोघरी पत्रके वाटून जनजागृती केली जात आहे. अशातच शहरातील मुख्य रस्त्यावरील भिंतींवर आकर्षक रंगरंगोटी करुन कोकणचे प्रतिबिंब उमटविण्यात आले आहे. ही चित्रे पाहताना पर्यटन महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण व नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनाही भिंतीवर चित्रे रंगविण्याचा मोह आवरला नाही.
दि. ६ मेपासून पर्यटन महोत्सवाचे बिगूल वाजणार आहे. दमदार शोभायात्रेने या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. शोभायात्रेनंतर संगीत मैफल रंगणार असून, दि. ७ रोजी आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या महोत्सवासाठी शहरात रंगरंगोटी करण्यात आली असून, शोभायात्रेसाठी जीवंत देखावे तयार केले जात आहेत. शहरात वातावरण निर्मिती करण्यासाठी सावर्डे स्कूल आॅफ आर्टचे विद्यार्थी, ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांचे कलाशिक्षक, शहर परिसरातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी शहरातील भिंतींवर कोकणची नजाकता दाखविणारी चित्रे रेखाटली आहेत. आमदार चव्हाण, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे, सभापती स्नेहा मेस्त्री, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील, जिल्हाप्रमुख सचिन कदम, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, आदी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या भिंतींची व चित्रांची पाहणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी साकारलेली आकर्षक चित्रे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.
ही चित्रे पाहून आमदार सदानंद चव्हाण व नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनीही चित्रे रंगविण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही हातात ब्रश घेत भिंती रंगविल्या. या पर्यटन महोत्सवासाठी शहराची सफाई मोहीम वेगाने सुरु झाली आहे. आज मंगळवारी बहादूरशेख नाका ते पाग नाका दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेला कचरा साफ केला जात होता. शहरातील मुख्य रस्त्यांचीही साफसफाई वेगात सुरु आहे.
हा गोळा केलेला कचरा जाळण्यात येत होता. त्यामुळे एकूणच शहरात या पर्यटन महोत्सवाची धामधूम व तयारी सुरु झाली आहे. चिपळूण शहरातून रिक्षा फिरवून या पर्यटन महोत्सवाबाबतच्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली जात आहे. (प्रतिनिधी)
आमदार, नगराध्यक्षांनीही भिंतीवर रंगवली चित्रे.
चिपळुणात ६ मेपासून पर्यटन महोत्सवाचे वाजणार बिगुल.
शोभायात्रेनंतर संगीत मैफलीचे आयोजन.
चिपळुणातील मुख्य रस्त्यांवरील भिंतींची रंगरंगोटी.
महोत्सवासाठी चिपळूणची सफाई मोहीम वेगात सुरु.
रिक्षाद्वारे उपनगरांमध्येही जनजागृती.
चिपळुणात स्वच्छता मोहीमही वेगात.
प्रशासन सज्ज.
चिपळूण येथे रत्नागिरी पर्यटन महोत्सवासाठी भिंतींची रंगरंगोटी सुरु आहे. भिंतींवरील आकर्षक चित्रे पाहून आमदार सदानंद चव्हाण व नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनाही मोह न आवरल्याने त्यांनी हातात ब्रश धरला.