चिपळुणात सावकारीचा पर्दाफाश; २० हजाराची तब्बल १ लाख वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:22 AM2021-06-28T04:22:03+5:302021-06-28T04:22:03+5:30
चिपळूण : गेल्या काही वर्षांपासून चिपळूणमध्ये सुरू असलेला सावकारी धंदा आणि पठाणी वसुलीचा अखेर पर्दाफाश झाला आहे. एका महिलेला ...
चिपळूण : गेल्या काही वर्षांपासून चिपळूणमध्ये सुरू असलेला सावकारी धंदा आणि पठाणी वसुलीचा अखेर पर्दाफाश झाला आहे. एका महिलेला २० हजार रुपये कर्ज देऊन तिच्याकडून २५ हजार रुपये वसूल करण्यात आले हाेते. त्यानंतर पुन्हा तब्बल १ लाख २०० रुपयांच्या पठाणी वसुलीसाठी तगादा लावून महिलेला मारहाण करून अश्लील शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षात चिपळूणमध्ये सावकारी धंद्याला उत आला होता. गरजेला पैसे द्यायचे आणि नंतर त्याची पठाणी वसुली सुरू करून कर्जदाराला धमक्या देणे, घरातील वस्तू उचलून नेणे असे प्रकार सतत सुरू होते. अनेक तरुण या धंद्यात उतरून आलिशान कार्यालये थाटून बसले आणि वसुलीसाठी तरुणांचे टोळके आणि तरुणी तसेच महिलाही ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, चिपळूण वडनाका येथील अभिजित गुरव या तरुणाने आत्महत्या केली आणि सावकारी विषयाला उघडपणे वाचा फुटली.
चिपळूण भेंडीनाका येथील बिलकीस अब्दुल करीम परकार या महिलेने चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार सावकारी करणारे शिवा खंडजोडे, चांगदेव खंडजोडे आणि पूजा मिरगल यांच्याकडून २० हजार रुपये कर्ज घेतले होते. त्या कर्जापोटी त्यांनी १५ हजार रुपये प्रथम अदा केले तसेच दंड म्हणून १० हजार रुपयेही त्यांच्याकडून वसूल करण्यात आले. एकूण २५ हजार रुपये देऊनही त्यांच्याकडून तब्बल १ लाख २०० रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी वसुलीचा तगादा लावला आहे, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
नंतर मात्र वेळोवेळी धमक्यांचे फोन सावकाराकडून येऊ लागले. घरी येऊन धमक्या देणे, पैशाची मागणी करणे तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, असे प्रकार सतत सुरू झाले. इतकेच नव्हे तर कार्यालयात बोलावून त्या महिलेला प्रचंड मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार, पूजा मिरगल, शिवा खंडजोडे आणि चांगदेव खंडजोडे या तिघांवर बेकायदा पैशाची वसुली, जबरदस्ती, मानसिक व शारीरिक त्रास, मारहाण व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------------------
सावकारी प्रकरणात पहिला गुन्हा दाखल
चिपळुणात सावकारी प्रकरणात हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता चौकशीचा ससेमिरा सुरू केला आहे. त्यामुळे काहींनी आपली कार्यालये बंद केली आहेत, तर काहीजण चिपळूणमधून पसार झाले आहेत. मात्र, त्याचवेळी अन्य काही तक्रारदार पुढे येण्याच्या तयारीत आहेत.