रत्नागिरी: आडिवरे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, दोन जनावरे जखमी
By अरुण आडिवरेकर | Published: October 29, 2022 06:48 PM2022-10-29T18:48:28+5:302022-10-29T18:48:50+5:30
एकाच रात्री दोन ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले
राजापूर : तालुक्यातील आडिवरे परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने वाडापेठ येथील वासरावर तर कोंभे येथे शेळीवर हल्ला करुन जखमी केले आहे. एकाच रात्री दोन ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेले काही दिवस आडिवरे परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मात्र, गुरुवारी (२८ ऑक्टोबर) बिबट्याने रात्रीच्यावेळी दोन ठिकाणी जनावरांवर हल्ला करुन जखमी केले. आडिवरे - वाडापेठ येथील शेतकरी दत्ताराम शंकर सकपाळ यांच्या पडवीत बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. या हल्ल्यात वासराच्या कानाला व मानेला दुखापत झाली आहे.
त्याच रात्री बिबट्याने आडिवरेपासून जवळच असणाऱ्या कोंभे गावात धुमाकूळ घातला. कोंभे येथील शेतकरी श्रीकांत कमलाकर नार्वेकर यांच्या गाभण शेळीवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने या शेळीच्या मानेचा लचका तोडून मानच नेली. या बिबट्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.