फासकीत अडकलेला बिबट्या वन विभागाकडून पिंजऱ्यात जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 05:46 PM2019-04-04T17:46:28+5:302019-04-04T18:07:30+5:30
बिबट्या फासकीत अ़डकल्याचे कोतवडे ग्रामस्थांना समजताच सारे ग्रामस्थ नदीकिनारी वाघाला पाहण्यासाठी धावले.
रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे (लावगणवाडी) येथे नदीकिनारी फासकीत अमडकलेल्या बिबट्याची वनविभागाने गुरूवारी सुटका करून त्याला यशस्वीरित्या पिंजऱ्यात जेरबंद केले.
गुरूवारी सकाळी डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबट्याच्या ओरडण्याचा आवाज काही ग्रामस्थांनी ऐकला. हे वृत्त कोतवडेचे उपसरपंच स्वप्नील मयेकर यांनी तातडीने वनविभागाला दिले. त्याबरोबर विभागीय वन अधिकारी विजयराज सुर्वे, रत्नागिरी परिक्षेत्राचे वन अधिकारी रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालीचे वनपाल एल. भि. गुरव, संगमेश्वरचे सुरेश उपरे, राजापूरच्या राजश्री कीर, लांजाचे व्ही. सी. पाटील, वनरक्षक परमेश्वर डोईफोडे, राहूल गुंठे, मिताली कुबल, तानू गावडे, वि. द. कुंभार, संजय गोसावी तसेच वनविभागाला सहकार्य करणारे सागर तारी, दिनेश चाळके हे घटनास्थळी दाखल झाले.
बिबट्या फासकीत अ़डकल्याचे कोतवडे ग्रामस्थांना समजताच सारे ग्रामस्थ नदीकिनारी वाघाला पाहण्यासाठी धावले. यावेळी पंचायत समिती सदस्य आबा पाटील, तसेच सरपंच प्रीती बारगुडे, उपसरपंच स्वप्नील मयेकर आणि पोलीस पाटील वैष्णवी माने याही उपस्थित होत्या. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी फासकीतून या वाघाची सुटका करून त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. त्याबरोबर ग्रामस्थांनीही सुटकेचा श्वास सोडला.
हा बिबट्या नर जातीचा असून सुमारे ३ वर्षाचा आहे. त्याची उंची ६७ सेंटिमीटर असून लांबी १५३ सेंटीमीटर इतकी आहे. या बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर वनविभागाकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.