चिपळुणात घरात घुसलेला बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:39 PM2017-10-04T14:39:45+5:302017-10-04T14:42:17+5:30
: चिपळूण शहरातील उक्ताड भागात काल रात्री एका घरात शिरलेल्या बिबट्याला पावणेतीन तासात जेरबंद करण्यात वन खात्याला यश आले. उक्ताडच्या डोंगराळ भागात मुश्ताक मुल्लाजी यांच्या घरात काल मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरला. तो एका पडक्या मोरीत लपून बसला होता.
रत्नागिरी , दि. ४ : चिपळूण शहरातील उक्ताड भागात काल रात्री एका घरात शिरलेल्या बिबट्याला पावणेतीन तासात जेरबंद करण्यात वन खात्याला यश आले.
उक्ताडच्या डोंगराळ भागात मुश्ताक मुल्लाजी यांच्या घरात काल मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरला. तो एका पडक्या मोरीत लपून बसला होता.
त्याच्या गुरगुरण्यामुळे घरातल्या लोकांना तेथे बिबट्या असल्याचा अंदाज आला. त्यामुळे घरात एकच गोंधळ उडाला. सर्वजण तत्काळ घराबाहेर गेले. वन खात्याला तत्काळ सूचना देण्यात आली. वनखात्याचे अधिकारी सचिन निलख, वनपाल आर. बी. पाताडे, जनरक्षक रामदास खोत, आर. डी. सुर्वे लगेचच घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पिंजरा लावला. पावणेबाराच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नर जातीच्या या बिबट्याचे वय एक वर्ष आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. या प्रकारामुळे उक्ताड परिसरात घबराट पसरली आहे.