चिपळूण, खेडमध्ये एकाचवेळी दोन बदुंकासह बिबट्याचे कातडे जप्त, चौघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 07:16 PM2022-04-12T19:16:46+5:302022-04-12T19:17:09+5:30
चिपळूण : तालुक्यातील गुढेफाटा ते पाथर्डी रस्त्यावर मोटरसायकलने जाणाऱ्या तरूणांकडून एक सिंगल बॅरल बंदूक व बिबट्याचे कातडे जप्त करण्यात ...
चिपळूण : तालुक्यातील गुढेफाटा ते पाथर्डी रस्त्यावर मोटरसायकलने जाणाऱ्या तरूणांकडून एक सिंगल बॅरल बंदूक व बिबट्याचे कातडे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले. याचवेळी खेड हद्दीतील मौजे मुरडे शिदेवाडी येथील एका घरावर पोलिसांनी छापा टाकून विनापरवाना असलेली बंदूक जप्त केली. याप्रकरणी केलेल्या चौकशीनंतर तळवटपाल उपाळेवाडी येथे छापा टाकून बंदूक निर्मीतीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.
सचिन रामचंद्र साखरकर (३६, रा. डुगवे, साखरकरवाडी), प्रदेश प्रकाश बुदर (४०, बुदरवाडी गुढे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे तसेच सिंगल बॅरल काडतुसची परवाना नसलेली बंदूक फोल्ड केलेल्या स्थितीत आणि ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांनी वन्यजीव सरंक्षणाच्या अनुशघाने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार यापुर्वी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेकडून रत्नागिरी ग्रामिण, राजापूर, लांजा व गुहागर येथे कारवाया केल्या होत्या. त्यानंतर सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेला चिपळूण तालुक्यातील गुढेफाटा येथे पाथर्डी रस्त्यावर दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचालीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार तेथे जाऊन संशयास्पद तरूणांची मोटारसायकल थांबवली. त्यांच्या सॅकची तपासणी केली, त्यामध्ये बिबट्याचे कातडे तसेच सिंगल बॅरल काडतुसची बंदूक व ४ जिवंत काडतुसे मिळाली. त्याप्रमाणे मोटारसायकलसह अन्य साहित्य जप्त केले आहे.
या कारवाईत सहायक पोलिस फौजदार प्रशांत शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विनायक माने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रशांत बोरकर, पोलिस हवालदार नितीन डोमणे, अरुण चाळके, बाळु पालकर, योगेश नार्वेकर, सत्यजित दरेकर व दत्तात्रय कांबळे यांनी सहभाग घेतला. त्यांना वनविभागाचे दत्ताराम राजाराम सुर्वे यांनी मदत केली
दुसऱ्या घटनेत खेडचे सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे मुरडे शिंदेवाडी येथील सचिन संतोष गोठल (२३) याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत विनापरवाना असलेली बंदूक जप्त केली. अधिक चौकशीअंती ही बंदूक पांडुरंग केशव सुतार ऊर्फ मेस्त्री ( ५३, रा. तळवटपाल, उपाळेवाडी खेड) यांच्याकडून खरेदी केल्याचे समजले. त्याप्रमाणे सुतार यांच्या घरावर छापा टाकला असता तेथे एक बंदूक व बंदूक निर्मीतीसाठी आवश्यक असलेले साहित्य जप्त केले. त्यानुसार या दोघांवर पोलिस शिपाई संकेत गुरव यांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत काशीद, पोलिस निरीक्षक निशा जाधव याचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे, पोलिस हवालदार विक्रम बुरॉडकर, संकेत गुरव, रोहित जोयशी, किरण चव्हाण यांनी कारवाई केली.