साखरी आगर येथे बिबट्या विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:38 AM2021-09-09T04:38:57+5:302021-09-09T04:38:57+5:30
गुहागर : तालुक्यातील साखरीआगर गावातील भरवस्तीत असलेल्या विहिरीमध्ये शिकारीच्या मागावर आलेला बिबट्या पडला. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी ...
गुहागर : तालुक्यातील साखरीआगर गावातील भरवस्तीत असलेल्या विहिरीमध्ये शिकारीच्या मागावर आलेला बिबट्या पडला. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
साखरी आगर येथील नंदकुमार नारायण झगडे यांच्या घराच्या मागे विहीर आहे लगेच जंगल परिसर आहे. विहिरीतील पंप सुरू होत नसल्याने सोमवारी घरातील काहीजण पंप पाहण्यासाठी विहिरीवर आले होते. विहिरीत त्यांना डरकाळीचा आवाज आल्याने विहिरीत पाहिले असता विहिरीतील एका खडकाच्या भागावर बिबट्या बसल्याचे दिसले.
झगडे यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी राजश्री कीर, गुहागरचे वनपाल परशेट्ये, रानवीचे वनरक्षक मांडवकर, अडूरचे वनरक्षक दुंडगे, आबलोलीचे वनरक्षक सावर्डेकर घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले. बिबट्या पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भर वस्तीमध्ये बिबट्या आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.