रत्नागिरीजवळील सोमेश्वरमध्ये बिबट्या जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 11:51 AM2018-06-24T11:51:55+5:302018-06-24T11:54:35+5:30
भातशेतीसाठी लावलेल्या तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. रत्नागिरी शहरालगत असणाऱ्या सोमेश्वर गावामध्ये आज पहाटेच्यावेळी हा बिबट्या पकडण्यात आला.
रत्नागिरी : भातशेतीसाठी लावलेल्या तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. रत्नागिरी शहरालगत असणाऱ्या सोमेश्वर गावामध्ये आज पहाटेच्यावेळी हा बिबट्या पकडण्यात आला. गावात बिबट्या पकडल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्याला बघण्यासाठी गर्दी केली होती.
सोमेश्वर येथे पवार यांच्या भातशेतीसाठी तारेचे कुंपण लावण्यात आले आहे. या कुंपणात बिबट्या अडकला होता. काल (शनिवारी)पासून ग्रामस्थांना बिबट्याचा आवाज येत होता, परंतु दिसला नव्हता. आज (रविवारी) पहाटे साडेपाचच्या सुमाराला ग्रामस्थांना तारेच्या कुंपणात बिबट्या अडकलेला दिसला. त्यानंतर त्यांनी लगेच वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली.
तालुका वन अधिकारी प्रियांका लगट या वन विभागातील कर्मचारी अधिकारी पिंजरा घेऊन आले. एका तासाच्या परिश्रमानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. हा बिबट्या ३ वर्षांचा असून, त्याच्या अंगावर कोठेही जखमा झालेल्या नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.