कुष्ठरूग्णांना तत्काळ उपचार द्यावेत
By admin | Published: February 11, 2015 10:50 PM2015-02-11T22:50:02+5:302015-02-12T00:32:28+5:30
आरोग्य विभाग बैठक : वसाहतीमधील रुग्णांना नवीन घरे देण्याची ग्वाही
रत्नागिरी : कुष्ठरोग वसाहतीतील रुग्णांना नवी घरे बांधून देण्यात येतील, तसेच त्यांच्यासाठी आवश्यक औषधसाठ्यासह मूलभूत सुविधा तत्काळ उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही महाराष्ट्र कुष्ठरोगपीडित संघटना, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आली.रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या कुष्ठरुग्णांच्या अनेक समस्या आहेत. वर्षानुवर्षे अनेक हालअपेष्टा सहन करत हे रुग्ण आला दिवस घालवत आहेत. त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आरोग्य विभागाची बैठक पार पडली.
महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेच्यावतीने यावेळी निवेदन देण्यात आले. सन १९५५ पासून उद्यमनगर येथे कुष्ठरुग्ण वसाहत आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत शासनाने दिलेली घरे मोडकळीस आल्याने त्यांना नवी घरे देण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली. जिल्हा नियोजन, आमदार फंड, दानशूर व्यक्तींच्या मदतीने घरांचे बांधकाम हाती घेतले जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरांची पाहणी करुन तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश यावेळी देण्यात आले.
कुष्ठरुग्णांची संख्या कमी झाल्याने ब्रिटिशकालीन कुष्ठरुग्णालय बंद करण्यात आले. परंतु यामुळे रुग्णांवर उपचार करणे कठीण झाले आहे. रुग्णांवर औषधोपचार व्हावेत, अशी मागणी करण्यात आली. सहाय्यक कुष्ठरोग संचालक कार्यालयाकडून कोणतीच मदत केली जात नसल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला. यावेळी सहाय्यक कुष्ठरोग संचालक कार्यालयामार्फत उपस्थित राहिलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची हजेरी घेण्यात आली. जिल्हा परिषदेमार्फत आवश्यक उपचार साहित्य तत्काळ देण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खंडागळे यांनी मान्य केले. सहाय्यक संचालकांना तत्काळ प्रस्ताव पाठवण्याची सूचना डॉ. खंडागळे यांनी केली आहे.
महानगरपालिकांच्या धर्तीवर ग्रामपंचायतीने कुष्ठरुग्णांना दरमहा १००० ते २५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर प्राधान्याने विचार करण्याचे सरपंच रज्जाक काझी यांनी सांगितले. या बैठकीला कुष्ठरोगपीडित संघटनेचे अध्यक्ष बळीराम तांबडे, सल्लागार भीमराव मधाळे, रसूल मुल्ला, माया रणावरे, तहसीलदार मारुती कांबळे यांच्यासह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)