‘संगमेश्वर’मध्ये लेप्टोचे आणखी तीन रुग्ण
By admin | Published: July 31, 2016 12:36 AM2016-07-31T00:36:56+5:302016-07-31T00:36:56+5:30
रुग्णांची संख्या २० वर
रत्नागिरी : जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात लेप्टोचे आणखी तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे लेप्टोच्या रुग्णांची एकूण संख्या २० झाली आहे़
पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात लेप्टोचे आतापर्यंत एकूण संशयित ९५ रुग्ण आढळून आले होते. त्या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरू असून, रक्त तपासणीनंतर आतापर्यंत १७ जणांना लेप्टो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये आणखी तीन रुग्ण संगमेश्वर तालुक्यात सापडले असून, लेप्टो झालेल्या रुग्णांची संख्या २० झाली आहेत. संगमेश्वर तालुक्यातील मालती रघुनाथ गोपाळ (वय ४०, कोलेवाडी, देवरुख), राजाराम सखाराम वाजे (४९, मेघी) आणि शंकर पांडुरंग कांबळे (४०, चोरवणे) हे रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.
शेतामध्ये काम करणारे शेतकरी तसेच प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती यांनी त्यांना जखम झालेली असल्यास त्वरित ड्रेसिंग करून घ्यावे़ शक्यतो उघड्या पायाने पाण्यामध्ये जाणे टाळावे़ पायामध्ये गमबुट घालावेत़ उंदीर व घुशी यांचा नायनाट करण्यात यावा़ तसेच लेप्टोची लक्षणे रुग्णामध्ये आढळून आल्यास त्वरित नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन उपचार करावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे़