रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जाेर ओसरला; नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 03:39 PM2024-07-29T15:39:04+5:302024-07-29T15:39:56+5:30

गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस

Less rainfall in Ratnagiri district; River water below warning level | रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जाेर ओसरला; नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या खाली

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जाेर ओसरला; नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या खाली

रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे इशारा पातळीच्यावर पाेहाेचलेल्या जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळीही कमी झाली आहे. संगमेश्वरातील शास्त्री नदी व राजापुरातील अर्जुना नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आली असून, खेडमधील जगबुडी नदीचे पाणी मात्र अजूनही इशारा पातळीवरच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७२.६७ टक्के (२४४४.७२ मिलीमीटर) पाऊस पडला आहे.

हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ दिला असतानाच शुक्रवारपासून पावसाचा जाेर काहीसा कमी झाला आहे. रविवारीही सकाळपासून पावसाने उसंत घेतली हाेती. मुसळधार काेसळणाऱ्या पावसामुळे संगमेश्वरातील शास्त्री नदी, राजापुरातील अर्जुना नदी आणि खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली हाेती. या नद्यांचे पाणी इशारा पातळीच्यावर पाेहाेचले हाेते. त्यामुळे संगमेश्वर, खेड आणि राजापुरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली हाेती.

मात्र, शुक्रवारपासून पावसाचा जाेर ओसरला असून, सरीवर पाऊस काेसळत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीतही घट झाली आहे. पावसाचा जाेर ओसरल्याने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

शास्त्री आणि अर्जुना नदीचे पाणी इशारा पातळीच्या खाली आले आहे. मात्र, जगबुडी नदीचे पाणी अजूनही इशारा पातळीवरच आहे. रविवारी दुपारी १२ वाजता या नदीचे पाणी ५.५० मीटरपर्यंत पाेहाेचले हाेते. नदीचे पाणी ओसरत असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस

जिल्ह्यात १ जूनपासून काेसळलेल्या पावसाने गतवर्षीपेक्षा जास्त सरासरी गाठली आहे. यावर्षी १ जूनपासून २८ जुलैपर्यंत सरासरी २४४४.७२ मिलीमीटर म्हणजेच ७२.६७ टक्के पाऊस पडला आहे. मात्र, गतवर्षी याच कालावधीत सरासरी २०५८.२६ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली हाेती. त्यावेळी ६१.१८ टक्के पाऊस पडला हाेता. यावर्षी आतापर्यंत ११.४९ टक्के जास्त पाऊस पडला आहे.

Web Title: Less rainfall in Ratnagiri district; River water below warning level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.