७५६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकावर धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2016 10:03 PM2016-04-24T22:03:54+5:302016-04-24T23:25:43+5:30
जिल्हा परिषद : शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मोठी मदत
रहिम दलाल-- रत्नागिरी --विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून अध्यापनाचे धडे देण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या ७५६ प्राथमिक शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मोठा आधार लाभणार आहे. जिल्हा परिषदेच्या २१ शाळांना आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या २७२० प्राथमिक शाळा आहेत. चालू शैक्षणिक वर्षामध्ये शून्य पटसंख्येच्या १३ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. १ ते २० पटसंख्येच्या १२०० शाळा आहेत. शाळांमधील कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळत असताना विद्यार्थीसंख्या कमी होत चालल्याने या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
संगणक युग असल्याने शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना त्याच्या वापराविषयी माहिती मिळावी, त्यादृष्टीने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाधिक शाळा डिजिटल बनवण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या २५१ केंद्रशाळांमध्ये डिजिटल स्कूल ही संकल्पना राबवण्यात येणार होती. चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, तळवडे क्रमांक १ ही जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा ठरली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन डिजिटल स्कूल करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार लोकवर्गणी गोळा करून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील ७५६ प्राथमिक शाळा डिजिटल बनविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज ग्रामीण भागातील विद्यार्थीही संगणकावर शिक्षणाचे धडे घेत आहेत.
डिजिटल स्कूल तयार करण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपये लोकवर्गणीतून गोळा करून खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये शासनाच्या दमडीचाही खर्च करण्यात आलेला नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचावत असल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनासाठी नक्कीच सुखकारक ठरत आहे.