पदाधिकाऱ्यांचीच बैठकीकडे पाठ
By admin | Published: December 12, 2014 09:50 PM2014-12-12T21:50:51+5:302014-12-12T23:41:24+5:30
चिपळूणमध्ये मीमांसा : राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीनंतरचे कवित्व सुरू...
चिपळूण : निवडणूक आली की, आपली ताकद आजमावण्यासाठी ५ वर्षे निष्ठेने राबणाऱ्या कार्यकर्त्याला मागे सारुन जातीपातीची गणित बांधून काही पदाधिकारी निवडून येतात. परंतु, निवडणूक झाल्यानंतर त्यांचा कुठेही प्रभाव जाणवत नाही. हे पदाधिकारी पक्षाच्या कार्यक्रमाला किंवा बैठकांनाही हजर होत नाहीत. अशा पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर बोलावलेल्या चिंतन बैठकीकडेही पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी गुरुवारी आत्मचिंतन बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांनी दांडी मारली होती. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यासारखा तगडा उमेदवार रिंगणात होता. तरीही पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले, याचे आत्मचिंतन या बैठकीत होणे गरजेचे होते. परंतु, नगराध्यक्ष सावित्री होमकळस, माजी नगराध्यक्ष रिहाना बिजले व गटनेते राजेश कदम, स्विकृत नगरसेवक इनायत मुकादमवगळता पक्षाचा निवडून आलेला एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. माजी सभापती सुरेश खापले, सभापती समीक्षा बागवेवगळता एकही पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषदेचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. मुळात पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आपापल्या भागात फिरत नसल्याने या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. आपले पदाधिकारी पक्षासाठी गावागावातून फिरत नसल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आले, ही एक चांगली गोष्ट आहे. जाती-पातीचा निकष लावून निरुपद्रवी माणसे निवडून दिल्यानंतर पक्ष वाढणार कसा? हा प्रश्न आहे. भविष्यात यातून बोध घेऊन क्रियाशील कार्यकर्त्याला नेते संधी देतील. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे. त्यांचे आपण देणे लागतो, याची जाणीव आजच्या पदाधिकाऱ्यांना राहिलेली नाही. आपण निवडून आलो म्हणजे आता आपले कोणी काही करु शकत नाही, अशा आविर्भावात ते राहात असल्याने सामान्य जनतेशी असलेली नाळ तुटत चालली आहे. त्याचा फटका निवडणुकीत बसतो. कारण खालच्या लोकप्रतिनिधींवरील राग लोकांनी त्या विधानसभा निवडणुकीत काढला आणि निकम यांच्यासारख्या उमेदवाराला त्याचा फटका बसला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. मुळात पदाधिकाऱ्यांच्या बेदिलीमुळे पक्षाची घसरण होत आहे. याचा विचार आता वरिष्ठ नेत्यांनी करायला हवा. एकेकाळी चिपळूण तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. परंतु, या तालुक्यात राष्ट्रवादीची घसरण होत आहे. हे थांबवायचे असेल तर ग्रामीण भागापासून संघटनात्मक बांधणीला सुरुवात करायला हवी. नेत्यांनी थेट संपर्क साधून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. अन्यथा ये रे माझ्या मागल्या... याप्रमाणे आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागतील. (प्रतिनिधी)
साऱ्यांनाच चिंता एकीची...
निवडणूक आली की, साऱ्यांसमोर असणारे कार्यकर्ते अथवा पदाधिकारी चिंतन बैठकीकडे पाठ फिरवतात, याचे आश्चर्य व्यक्त करीत राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीनंतर शहरात प्रतिक्रया उमटल्या आहेत. तालुकाध्यक्षांनी बोलावलेल्या चिंतन बैठकीला एका गटाने गैरहजेरी लावल्याने गटबाजीचे दर्शन घडले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य मतदारसंघात फिरत नसल्याचा ठपका.
अनेक जिल्हा परिषद सदस्य नॉट रिचेबल.
पक्षवाढीसाठी पुनर्रचना होणे गरजेचे.
रमेश कदम, जयंद्रथ खताते यांनी दिल्या कानपिचक्या.
संपर्कावर देणार भर.