कामगारांना न्याय मिळवून देऊ : सचिन चाळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:11+5:302021-07-14T04:37:11+5:30
आवाशी : प्रशासनावर असलेला वचक, राज्याचा कारभार हाकण्याचा असलेला अनुभव, उद्योग निर्मितीची असणारी धडपड या सगळ्याचा फायदा घेत इथल्या ...
आवाशी : प्रशासनावर असलेला वचक, राज्याचा कारभार हाकण्याचा असलेला अनुभव, उद्योग निर्मितीची असणारी धडपड या सगळ्याचा फायदा घेत इथल्या वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणार असून, इथली सर्व परिस्थिती कथन करणार असल्याचे मत लोटे (ता. खेड) येथील माजी सरपंच सचिन चाळके यांनी नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले.
लोटे - परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगधंद्यांना नवसंजीवनी मिळवून देतानाच इथल्या कामगारांवर होणाऱ्या अन्यायाबाबतही मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन लक्ष वेधणार असल्याचे चाळके यांनी सांगितले. नारायण राणे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, ते केंद्रीय मंत्रिमंडळात असल्याकारणाने उद्योजक व कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावतील. त्याचबरोबर कोकणात नवनवीन उद्योग आणण्यावर त्यांचा भर असल्याकारणाने कोकणच्या विकासासाठी मोलाचा हातभार लागणार आहे. त्यांच्या मंत्रीपदामुळे आम्हा युवकांना नवचैतन्य प्राप्त झाले असून, इथल्या औद्योगिकरणाच्या समस्या सोडविण्यात आपण पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सचिन चाळके यांच्यासह रोशन कालेकर, कपिल आंब्रे, नितीन मोरे, संदेश चाळके, वैभव आंब्रे, संकेत हुमणे, गणेश गोवळकर, तुषार गोवळकर उपस्थित होते.