खेळाडूंना मदत करू
By admin | Published: February 26, 2017 12:13 AM2017-02-26T00:13:07+5:302017-02-26T00:13:07+5:30
रवींद्र वायकर : म्हाडा कला - क्रीडा महोत्सव तरंग २०१७
दापोली : या क्रीडा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील करिअरसाठी शासनामार्फत आवश्यक मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दापोली येथे दिली. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचेही वायकर यांनी यावेळी सांगितले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांनी आयोजित केलेल्या ‘म्हाडा कला व क्रीडा महोत्सव तरंग २०१७’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबईचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाचे सचिव बी. एन. बास्टेवाड, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने, दापोलीच्या नगराध्यक्षा उल्का जाधव उपस्थित होते.
कोकण ही निसर्गसंपन्न भूमी आहे. कोकणात समुद्रकिनारे, किल्ले तसेच अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे कोकणातील पर्यटन वृध्दीसाठी शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून म्हाडा कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे वायकर यांनी सांगितले.
दापोलीतील नवानगर झोपडपट्टीसाठी म्हाडाच्या माध्यमातून सर्व सुखसोयींनी समृध्द असलेली घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी म्हाडा व प्राधिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच महापौर बसणार असल्याचे वायकर म्हणाले. तर काँग्रेसचं नावं न घेता त्यांनी शिवसेनेचा महापौर बनवण्यासाठी जे-जे मदत करतील त्यांची मदत शिवसेना घेईल, असं सांगितलं. कोण मदत किती करतयं, त्याचे राजकीय समिकरणे सुरु आहेत. मुंबईत शिवसेनाच हवी असे सर्वसामान्य मुंबईकरांना वाटत आहे, मतदारांनी सेनेला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे मुंबईत सेनेचाच महापौर असेल, असे ते म्हणाले.
कोकण समृद्धीस सरकार कटिबद्धच
पुढील काळात कोकणचा विकास पर्यटनातून करण्यासाठी प्रयत्न करू गोव्याकडे जाणारा पर्यटक कोकणात वळवण्यासाठी प्रयत्नशील राहू, या पूर्वीच्या सरकारने कोकण पर्यटनाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच कोकण पर्यटन मागासले आहे. इतर प्रदेशांच्या तुलनेत कोकण प्रदेश खूपच सुंदर आहे, कोकणाला निसर्गाचे वरदान लाभले आहे ते टिकवणे आपली जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोकण पर्यटनातून समृद्ध कोकण बनविण्यासाठी युतीचे सरकार कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.